Arole Hospital : डाॅ आरोळे बहिण भावांनी केलेल्या निस्वार्थ आरोग्य सेवेचा गौरव !
23 कोटी रूपये खर्चून जामखेडमध्ये ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित
जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तार शेख) : कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेत जामखेडच्या आरोळे हाॅस्पीटल चे संचालक डाॅ रवी आरोळे व डाॅ शोभा आरोळे या भावडांनी कोरोना रुग्णांवर रेमडेसिविर औषधाचा वापर न करता केलेले मोफत उपचाराचे कार्य कौतुकास्पद असून इतरांना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जामखेडमध्ये बोलताना केले.
राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे शनिवारी जामखेड तालुका दौर्यावर होते. या दौर्यात त्यांनी कोविड रुग्णांवर मोफत उपचार करून निस्वार्थी आरोग्य सेवा दिल्याबद्दल जामखेड येथील आरोळे हाॅस्पीटलचे डॉ. रवी आरोळे आणि डाॅ. शोभा आरोळे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आरोळे हास्पीटलच्या पॅथ लॅब सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी डॉ. रवी आरोळे आणि डाॅ. शोभा आरोळे यांनी पालकमंत्र्यांना आरोळे हास्पीटलमधे कोविड रुग्णांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली.
कार्यक्रमानंतर कर्जत – जामखेड मतदारसंघातील कोरोनाची सद्यस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी जामखेड येथील राज लाॅन्स येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी पार पडली. यावेळी आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. रवी आरोळे, डॉ. शोभा आरोळे यावेळी उपस्थित होते.
सत्तर टक्के लसीकरण होणे आवश्यक – मुश्रीफ
यावेळी बोलताना मंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट तिव्र असणार आहे. या लाटेत आतापर्यंतच्या रुग्णापेक्षा चौपट रुग्ण वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासोबतच वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. तिसर्या लाटेमुळे जास्त नुकसान न होण्यासाठी जवळपास सत्तर टक्के नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आॉक्सिजनची पुरेशी उपलब्धता, रुग्ण बेड संख्या वाढविणे, ग्रामिण रुग्णालयांचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करणे, जिल्हयात चौदा ठिकाणी आॉक्सिजन प्लँट स्थापन करण्यासोबत विविध उपाययोजनांची तयारी केली असून नागरिकांनीसुद्धा लसीकरण करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्राम विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
लसीचा पुरवठा वाढवावा – रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी यांनी भरीव सहकार्य केल्यामुळे कोविड रुग्णसंख्या कमी झाल्याचे प्रतिपादन केले. कोविड उपाययोजनांसाठी आमदार निधीतून सुमारे दिड कोटी रुपये खर्च केला असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्यातील लसीकरण नियोजनबध्द पध्दतीने केल्याचे सांगून लसींचा पुरवठा वाढविण्याची मागणी केली.
पाॅझिटीव्हिटी रेट कमी – जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर जिल्हयात रुग्णसंख्या वाढली असली तरी पाॅझिटिव्हीटी रेट कमी असल्याचे सांगितले. कोरोना घालवायचा असल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी कोरोनाची सद्यस्थिती आणि प्रशासनाने केलेल्या कार्याची माहिती आढावा सादर करताना दिली.
23 कोटी रूपये खर्चून ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित
आॉक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि कोविड आॉक्सिजन बेड आरोग्य केंद्राचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ झाला.जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तेवीस कोटी रुपये खर्चून बांधलेल्या लिक्विफाईड मेडिकल आॉक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा आणि आरोग्य केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. या सुविधांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना कोविड उपचारासाठी शहरात येण्याची आवश्यकता भासणार नाही.