शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगास प्राधान्य द्यावे – राजाराम गायकवाड, जामखेडमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कार्यशाळा उत्साहात संपन्न
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। शेतकरी बांधवांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना हाती घेण्यात आली आहे. जिथे जो माल पिकतो त्या मालावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे राहिल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील, याशिवाय शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव मिळेल. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगास प्राधान्य द्यावे असे अवाहन आत्माचे प्रकल्प संचालक राजाराम गायकवाड यांनी केले.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जामखेड तालुका कृषी विभाग आणि आत्माच्या वतीने गुरुवारी जामखेड पंचायत समितीच्या सभागृहात एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, शेतकरी उद्योजक आणि महिला उद्योजक मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
यावेळी पार पडलेल्या कार्यशाळेत आत्माचे प्रकल्प संचालक राजाराम गायकवाड यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर माहिती दिली. 2025 पर्यंत महाराष्ट्रात एक लाख प्रक्रिया उद्योग उभारण्याचे उद्दिष्ट आहे असे सांगत वैयक्तीक आणि गट लाभ असा स्वरूपात योजनेचा लाभ घेता येतो प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत झालेले बदल त्यांनी समजावून सांगितले.
या योजनेसाठी 1 लाख ते 1 कोटीपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येेेते. शेतकरी बांधवांच्या शंकांचे निरसन करत योजनेविषयीचे गायकवाड यांनी सखोल मार्गदर्शन केले.जामखेड तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनीही यावेळी शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी जाणुन घेत त्यावर मार्ग काढण्याचा शब्द दिला.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक राजाराम गायकवाड, विकास खाडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मंडल कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, दीपक लोंढे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक तुषार गोलेकर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश वारे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे फुलसौंदर, दिगंबर कुलकर्णी, प्रगतशील शेतकरी मकरंद काशीद, श्रीधर चिवडे, अशोक मोहळकर, रामेश्वर मेनकुदळे सह आदी उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातून 50 अर्ज प्राप्त
केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी जामखेड तालुक्यातून 50 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील 6 जणांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. इतरांची प्रोसेस सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेकडे कर्ज प्रकरणे केली जात आहेत.
डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन करणार योजनेची अंमलबजावणी
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठी DPR तयार करणे, जिल्हाधिकारी यांची मंजुरी घेणे, बँकेशी पत्रव्यवहार करणे यासाठी शासनाने डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन म्हणुन स्वतंत्र माणसाची नेमणूक केली आहे. त्या माणसाला शेतकऱ्यांनी एकही रूपया द्यायचा नाही. संबंधित अधिकारी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहजपणे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे अवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.