धक्कादायक : बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; कर्जत तालुक्यातील घटना !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मागील वर्षी नरभक्षक बिबट्याने निर्माण केलेल्या दहशतीच्या आठवणी अजुनही ताज्या असतानाच आता पुन्हा कर्जत तालुक्यात बिबट्या सक्रीय झाल्याची धक्कादायक बाब सोमवारी उघडकीस आली आहे.कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. यामुळे कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कर्जत तालुक्यातील डोबांळवाडी शिवारात सोमवारी  बबन बापू कुऱ्हाडे, रघुनाथ मारुती मासाळ दादा कोंडीबा मासाळ, नवनाथ जगन्नाथ मासाळ व इतर दोन नातेवाईक असे सर्वजण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये काम करत होते. यापैकी बबन कुऱ्हाडे व रघुनाथ मासाळ हे दोघेजण त्यांच्याकडील शेळ्यामेंढ्यांना चारत होते. त्याचवेळी बाजरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने बबन कुऱ्हाडे यांच्यावर झडप मारली.बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात बबन कुऱ्हाडे हे गंभीररित्या जखमी  झाले आहेत. त्यांच्या उजव्या हातावर, मानेवर, पोटावर, गळ्याभोवती बिबट्याने चावा घातल्याने खोलवर जखमा झाल्या आहेत.

शेजारी असलेले रघुनाथ मासाळ हे अचानक घडलेल्या घटनेने घाबरून गेले होते. परंतु याही परिस्थितीत न डगमगता जिवाच्या आकांताने जोरात ओरडल्याने शेतामध्ये असणारे दादा मासाळ नवनाथ मासाळ व इतर दोघे जण त्याठिकाणी पळत आले व सर्वांनी जोर जोरात आरडा-ओरडा केल्याने बिबट्याने बाजरीच्या पिकामध्ये धुम ठोकली.

Farmers seriously injured in leopard attack Incidents in Karjat taluka

आकस्मात हल्ला झाल्याने बबन कुराडे व रघुनाथ मासाळ हे दोघेजण प्रचंड घाबरले होते तशाही परिस्थितीमध्ये इतरांनी त्यांना धीर देऊन खाजगी गाडीतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ आणले. प्राथमिक उपचार करून जखम खोलवर असल्यामुळे व आवश्यक असणारी इंजेक्शन उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे बबन कुऱ्हाडे यांना तातडीने अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार, मोहन शेळके, वनपाल अनिल खराडे, रमेश पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटना स्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे डोंबाळवाडीत शेतकऱ्यांवर झालेला हल्ला बिबट्यानेच केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  नागरिकांनी बाजरीच्या शेताला वेढा दिला आहे. परंतु सायंकाळ पर्यंत बिबट्याचा मागसुम लागला नाही.

दरम्यान मागील वर्षी आष्टी, कर्जत, जामखेड, करमाळा या चार तालुक्यात नरभक्षक बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला होता. यात अनेकांचा जीव गेला होता. आता पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात बिबट्या सक्रीय झाल्याने या भागात मोठी खळबळ उडाली आहे.मागील वर्षीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. बिबट्या पुन्हा सक्रीय झाल्याने कर्जत तालुका हादरून गेला आहे.