अहमदनगर येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा – गौतम कोल्हे यांचे अवाहन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ओबीसी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी करू नका अशी मागणी करत राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी अहमदनगर येथे 3 फेब्रुवारी 2024 रोजी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे, या सभेस जामखेड तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा ओबीसी सेलचे जामखेड तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे यांनी केले आहे.

Attend in large numbers for OBC Elgar Sabha to be held in Ahmednagar - Gautam Kolhe's appeal

मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समाज करू नये यासाठी राज्यातील ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मात्र त्यांचा ओबीसीत समावेश करू नये, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये,  अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात ओबीसी नेत्यांकडून ठिकठिकाणी सभा घेऊन ओबीसी बांधवांची एकजूट दाखवली जात आहे.

मुंबई येथे राज्यातील ओबीसी बांधवांची महा एल्गार सभा पार पडणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरु आहे. अश्यातच उद्या 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला जामखेड तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी होणार आहेत, असे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे म्हणाले.

अहमदनगर येथे होणारी एल्गार सभा ऐतिहासिक करण्यासाठी जिल्हाभर बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे.ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सभेस उपस्थित रहावे यासाठी तगडे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील ओबीसी समाज आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकवटणार आहेत, असे कोल्हे म्हणाले.

अहमदनगर येथे पार पडणाऱ्या एल्गार सभेस ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ,  आमदार प्रा राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर,  पद्मभूषण लक्ष्मण गायकवाड, ओबीसी नेते टीपी मुंडे सह आदी ओबीसी नेत्यांसह राज्यभरातील समाजातील लोक मोठ्या संख्येने एल्गार सभेस उपस्थित राहणार आहेत.या ऐतिहासिक सभेसाठी जामखेड तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन भाजपा ओबीसी सेलचे जामखेड तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे यांनी केले आहे.