अजितदादा पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर : “बघतोच तो कसा निवडून येतो ते ; शरद पवार गटाच्या नेत्याला अजितदादांचे ओपन चॅलेंज”
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुणे : 25 डिसेंबर 2023 : राज्याच्या राजकारणात कधी काही होईल याचा नेम नाही. 2019 पासून राज्याच्या राजकारणात सतत वेगवेगळे राजकीय भूकंप होत असल्याचे दिसत आहेत.शिवसेना पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीतही उभी फुट पडली. दोन पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर मोठा राजकीय संघर्ष उफाळून येऊ लागला आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गट विरूध्द शरद पवार गट यांच्यात आता टोकाचा संघर्ष सुरू झालाय. दोन्ही गटांकडून ऐकमेकांविरूध्द जोरदार टीकास्त्र सोडले जात आहेत. अजित पवारांनी शरद पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. शरद पवार गटाच्या एका नेत्यांचा समाचार घेताना अजित पवारांनी तो निवडून कसा येतो असे खुले आव्हान दिल्याने राजकीय वातावरण जोरदार तापले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे नेहमी रोखठोक अश्या परखड भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या डोक्यात जो नेता बसला त्याचा त्यांनी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. आजवर अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रात घडली आहेत. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना याचा सर्वाधिक अनुभव आहे. विजय शिवतारे हे निवडूनच कसे येतात हे मी पाहतो अशी धमकी अजित पवारांनी सार्वजनिक कार्यक्रमात यापुर्वी दिली होती. अजित पवारांनी आपली धमकी खरी करून दाखवत विजय शिवतारे यांचा पराभव घडवून आणला होता. आता अजित पवार यांची वक्रदृष्टी शरद पवार गटाचे खासदार डाॅ अमोल कोल्हे यांच्यावर पडली आहे. मी बघतोच तो कसा निवडून येतो असे म्हणत अजित पवार यांनी कोल्हे यांना खुले आव्हान दिले आहे.
राष्ट्रवादीतून अजित पवार यांना फारकत घेतल्यानंतर आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अजित पवार गटाने आम्हीच मुळ राष्ट्रवादी असा दावा ठोकत शरद पवार यांना खंडित पकडले आहे. राष्ट्रवादीत सुरु असलेला सत्तासंघर्ष हा नुराकुस्ती नाही हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. अजित पवारांनी थेट शरद पवारांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय बारामतीतील कार्यक्रमातून आला. आता अजित पवारांच्या रडारवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डाॅ अमोल कोल्हे आले आहेत. शिरूर मतदारसंघाविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच. मी बघतोच तो कसा निवडून येतो असे म्हणत त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. अमोल कोल्हे चांगले अभिनेते आहे. संभाजी महाराजांची त्यांनी साकारलेली भूमिका चांगली होती. यामुळे ते घराघरात पोहचले. मतदारांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल चांगली भावना होती. मात्र, त्यांना निवडणून आणण्यात मी आणि वळसे पाटील यांनी मेहनत घेतली. पुन्हा जर ते उभे राहिले तर त्यांना पाडणारच, ते निवडून कसे येतात हे बघतोच असे देखील अजित पवार म्हणाले.पवार हे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.
शिरूरमध्ये उमेदवारी देण्यास चुकला का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “तेव्हा योग्य पद्धतीनं उमेदवारी दिली होती. आम्ही जनाधार पाहून उमेदवारी देतो. निवडून आल्यानंतर कसं काम करायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. मात्र, आता शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीत पाडण्याची धमकी दिल्याने शरद पवार गटात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना आपला राजकीय हिसका दाखवत मागील निवडणुकीत पाडलेले आहे. हा इतिहास महाराष्ट्राला माहित आहे. आता शरद पवार गटाचे खासदार डाॅ अमोल कोल्हे यांना पाडण्याची उघड धमकी अजित पवारांनी दिल्याने राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. अजित पवारांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केल्याने शरद पवार गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.