कर्जतमध्ये पुन्हा राजकारण तापले; कर्जत नगर पंचायतच्या चार प्रभागांसाठी 28 उमेदवारी अर्ज दाखल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 3 जानेवारी 2022 | कर्जत नगरपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. राज्यात पहिला टप्पा अनेक कारणांनी गाजला होता. आमदार रोहित पवार विरूध्द राम शिंदे हा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिले. निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातही हा संघर्ष उफाळून येणार का याची कर्जतकरांना उत्सुकता आहे. (28 nominations filed for four wards of Karjat Nagar Panchayat elections)

कर्जत नगरपंचायतच्या दुसर्‍या टप्प्यातील चार प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.  शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

कर्जत नगरपंचायतीच्या उर्वरीत चार प्रभागासाठी निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर झाल्यानंतर आज शेवटच्या दिवशी चार जागेसाठी २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १ गायकरवाडी – ९, प्रभाग क्रमांक ३ ढेरेमळा – १०, प्रभाग क्रमांक ५ पोस्ट ऑफिस परिसर – ३ आणि प्रभाग क्रमांक ७ – बुवासाहेब नगर – ६ असे एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली.

प्रभागनिहाय दाखल उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे

गायकरवाडी (सर्वसाधारण महिला) : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ज्योती लालासाहेब शेळके, जनाबाई लक्ष्मण गायकवाड, द्वारका बाळू वाघमारे तर भाजपातर्फे शीतल बबन फुले, वंदना भाऊसाहेब वाघमारे, संध्या दिपक मांडगे तर शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार संध्या दिपक मांडगे. तसेच जनाबाई गायकवाड आणि वंदना वाघमारे यांचा स्वतंत्र अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे.

ढेरेमळा (सर्वसाधारण पुरुष) : भाजपा – रघुनाथ किसन ढेरे, रावसाहेब पंढरीनाथ खराडे, विजयकुमार दादासाहेब ढेरे. राष्ट्रवादी काँग्रेस – भुषण रावसाहेब ढेरे, संतोष सोपान मेहत्रे यांनी तर अपक्ष म्हणून संजय नामदेव नेवसे, शांता मुकिंदा समुद्र, योगेश रतन नेवसे, राणी अमोल ढेरे, अविनाश शंकर नेवसे.

पोस्ट ऑफिस परिसर (सर्वसाधारण महिला) : भाजपा – सारिका गणेश क्षीरसागर. काँग्रेस – रोहिणी सचिन घुले  यासह घुले यांचा स्वतंत्र अपक्ष देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बुवासाहेब नगर : भाजपा – राम निवृत्ती ढेरे, दादासाहेब अर्जुन सोनमाळी. राष्ट्रवादी काँग्रेस – सतिश उध्दवराव पाटील, अक्षय शरद तोरडमल यासह तोरडमल यांना शिवसेनेने देखील पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली आहे. याच प्रभागात योगिता सोनमाळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील चार जागांसाठी २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याची छाननी मंगळवारी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. तर १० जानेवारीला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत राहणार. १८ रोजी मतदान पार पडणार आहे. कर्जत नगरपंचायतीच्या एकूण १७ जागेचा निकाल १९ जानेवारी रोजी लागणार आहे.