पिंपरी-चिंचवड, दि 4 एप्रिल, जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात कुरिअरद्वारे तलवारी आणि इतर प्राणघातक शस्त्रे मागवण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.अशीच एक घटना पिंपरी-चिंचवड परिसरातून उघडकीस आली आहे. दिघी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत 97 तलवारी, 02 कुकरी, 09 म्यान, अशी तीन लाख 22 हजारांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही घटना उघडकीस येताच उद्योग नगरीत मोठी खळबळ उडाली आहे.
तलवार प्रकरणात दिघी पोलिसांनी उमेश सुद (रा. अमृतसर, पंजाब) अनिल होन (रा. औरंगाबाद), मनींदर (रा. अमृतसर, पंजाब), आकाश पाटील (रा. चितली, ता. राहता, जि. अहमदनगर) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तलवारींचा इतका मोठा साठा नेमका कोणत्या कारणासाठी मागवण्यात आला होता ? घातपाताचा तर उद्देश नव्हता ना ? याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये अवैधपणे तलवारीचा साठा आढळून आला होता. त्या अनुषंगाने सर्व कुरिअर कंपनीमध्ये येणाऱ्या सर्व पार्सलचे काळजीपूर्वक स्कॅनींग करणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुरिअर कंपन्या त्यांच्या गोडाउनमधील माल एक्सरे मशीनमधून स्कॅन करीत होत्या.
डीटीडीसी कुरिअर कंपनीचे दिघी येथे मध्यवर्ती वितरण केंद्र असून, कंपनीचे दिघी येथे गोडाऊन आहे. आरोपी उमेश सुद याने आरोपी अनिल होन याला दोन लाकडी बॉक्स डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये पार्सल पाठविले होते. हे बॉक्स एक एप्रिलला एक्सरे स्कॅनिंग मशिनव्दारे तपासणी केली असता बॉक्समध्ये तलवार सदृश वस्तू आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी दोन लाकडी बॉक्समधील 92 तलवारी, 02 कुकरी,02 म्यान असा तीन लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी मनींदर याने आरोपी आकाश पाटील याला एका बारदानच्या कापडामध्ये पार्सल पाठवले होते. डीटीडीसी कुरिअर कंपनीच्या दिघी येथील गोडाऊनमध्ये रविवारी (दि. 3) बारदानाच्या कापडातील या पार्सलची एक्सरे स्कॅनिंग मशिनव्दारे तपासणी केली असता त्यामध्ये तलवार सदृश वस्तू आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी जप्त केल्या.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस कर्मचारी अमोल जाधव, शेखर शिंदे, हेमंत डुंबरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.