जवळा सोसायटी निवडणुकीचा उद्या फैसला ; कोण मैदानात ? कोण बाहेर ? खलबते सुरू

जामखेड, दि 4 एप्रिल, जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख : जामखेडच्या राजकारणातील सर्वात मोठ्या जवळा सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा (javala Society Election 2022) फैसला उद्या होणार आहे. उद्या 5 एप्रिल रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. एकास एक लढत व्हावी यासाठी पॅनलप्रमुखांनी कंबर कसली आहे. अर्ज माघारीत कुणाचा पत्ता कापला जाणार ? कोण मैदानात दंड थोपटणार? याचा उद्या फैसला होणार आहे.

जामखेड तालुक्याच्या राजकारणात जवळा हे महत्वाचे राजकीय मैदान आहे. जवळा सोसायटीच्या निवडणूकीच्या माध्यमांतून येथील राजकीय ‘आखाड्यात’ अनेक दिग्गज ‘राजकीय पहिलवान’ ऐकमेकांना ‘धोबीपछाड’ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारापुर्वी आरोप प्रत्यारोप, फोडाफोडी आणि जोर बैठकांना जोर आला आहे. तब्बल 64 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करत धुराळा उडवून दिला होता. त्यात एक अर्ज बाद झाल्याने 63 अर्ज वैध ठरले होते.

उद्या 5 एप्रिल हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून जवळ्याचे राजकीय वातावरण भलतेच तापले आहे.आपल्या पॅनलमध्ये व्होट बँकेवाले (VOTE BANK) तगडे उमेदवार असावेत, यासाठी पॅनल प्रमुख जोरदार तयारीत गुंतले आहे. जोर बैठकांना मोठा जोर आला आहे. आजची रात्र पॅनल प्रमुखांसाठी महत्वाची असणार आहे.

63 उमेदवारी अर्जातून उद्या कोण माघार घेणार याचा फैसला आजच्या रात्री होणार आहे. त्यामुळे जवळ्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. अमूक उमेदवाराला उमेदवारी का ? यामागे विजयाचे गणित मांडले जात आहे. इच्छुकांची मनधरणी करण्यात यश येत आहे.परंतू काहींची समजुत घालण्यासाठी राजकीय खलबते वेगाने सुरू आहेत. उमेदवारी फायनल करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

5 एप्रिल रोजी दुपारी 3 नंतर जवळा सोसायटीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत कोणता राजकीय पहिलवान कोणत्या पॅनलमध्ये हेही स्पष्ट होणार आहे तसेच कुणाला उमेदवारी आणि कुणाचा पत्ता कट हेही स्पष्ट होणार आहे. एकूणच जवळा सोसायटीची निवडणुक यंदा गाजणार असेच दिसून येत आहे.