- Advertisement -

स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अन्नत्याग अंदोलन : रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते असलेल्या रविकांत तुपकरांनी गेल्या ३ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली आहे.

नागपूरमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तो हाणून पाडत त्यांना बुलढाण्यात राहत्या घरी पाठवलं आहे. दरम्यान तुपकरांच्या या आंदोलनाला स्थानिक शेतकऱ्यांचा चांगलाच पाठींबा मिळताना दिसत आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जागोजागी रास्तारोको अंदोलन केलं.

ज्यात औरंगाबाद-अमरावती, औरंगाबाद – नागपूर, बुलडाणा – अजिंठा, बुलडाणा – अकोला, बुलडाणा- चिखली, बुलडाणा- मलकापूर असे महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरले. सध्या तुपकरांना मिळणारा पाठींबा लक्षात घेता विदर्भ आणि मराठवाड्यात हे आंदोलन पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8 हजार रुपये आणि कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा यासाठी तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.

दरम्यान आंदोलनाला तीन दिवस होऊनही अद्याप कोणत्याही राजकीय नेत्याने तुपकरांची दखल घेतलेली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तुपकर यांच्या आई आज आंदोलनस्थळी दाखल झाल्या होत्या.

आपल्या मुलाची बिघडलेली तब्येत पाहून तुपकरांच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. आपल्या मुलाला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार राहिल अशी प्रतिक्रीया तुपकर यांच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.रविकांत तुपकर यांच्या आई आज आंदोलनस्थळी भावूक झालेल्या पहायला मिळाल्या

दरम्यान संध्याकाळी उशीरा आंदोलनस्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रफीक शेख यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतू उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेत मध्यस्थी केल्यामुळे हा अनुचित प्रसंग टाळण्यात आला. सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत असा संतप्त सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे. (Swabhiman Shetkari Sanghatana’s hunger strike: Ravikant Tupkar’s health deteriorated)