जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. वाई तालुक्यातील एका सणकी मुख्याध्यापकाने आपल्याच सहकारी महिला शिक्षिकेवर शाळेच्या आवारात लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. खावली गावातील या थरारक घटनेमुळे वाई तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

तक्रारीतील माहितीनुसार, पीडित महिला शिक्षिका काही दिवसांपूर्वी शासनाच्या पाच दिवसीय प्रशिक्षणासाठी पाचवड येथे गेल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र विष्णू दीक्षित (रा. वडयली, ता. वाई) यांनी एका विद्यार्थ्याला वर्गाबाहेर चप्पल ठेवण्याच्या ठिकाणी बसवून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. प्रशिक्षण संपवून संबंधित महिला शिक्षिका शाळेत परतल्यानंतर, पीडित विद्यार्थ्याचे वडील संतोष वाडकर (रा. माची, ता. वाई) यांनी वर्गशिक्षिका म्हणून त्यांच्याकडे या प्रकाराबाबत विचारणा केली.
यानंतर पीडित शिक्षिकेने मुख्याध्यापकांकडे याबाबत जाब विचारला असता, मुख्याध्यापक दीक्षित यांनी उद्धटपणे उत्तर दिले. “तुम्हीच काय ते मिटवा… माझ्याकडे का आलात?” असे म्हणत “तुम्हाला नंतर बघून घेतो,” अशी धमकीही त्यांनी महिला शिक्षिकेला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शाळेच्या मैदानात थरार; विद्यार्थ्यांसमोरच बेदम मारहाण
गुरुवारी (१६ जुलै) सकाळी सुमारे १०.१५ वाजता मुख्याध्यापक दीक्षित हे दोन विद्यार्थ्यांना मारहाण करत असताना महिला शिक्षिकेने मध्यस्थी केली. त्यांनी मुख्याध्यापकांना मुलांना परिपाठासाठी पाठवण्याची विनंती केली. या विनंतीचा राग अनावर झाल्याने मुख्याध्यापकाने शिवीगाळ करत हातात लाकडी दांडके घेतले आणि ते महिला शिक्षिकेच्या अंगावर धावून गेले.
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पीडित महिला शिक्षिका शाळेच्या मैदानाच्या दिशेने पळू लागली. मात्र, आरोपी मुख्याध्यापकाने पाठलाग करून मैदानावरच त्यांना गाठले आणि हात, पाय, पाठ व मानेवर लाकडी दांडक्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांसमोरच घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण शाळेत आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
“मी तुमच्या बहिणीसारखी…” आर्त विनवणी तरीही मारहाण सुरूच
हल्ल्या दरम्यान पीडित शिक्षिका अत्यंत वेदनेने विव्हळत “मला लहान मुलगी आहे… मी तुमच्या बहिणीसारखी आहे… मला मारू नका!” अशी आर्त विनवणी करत होत्या. मात्र, संतापलेल्या मुख्याध्यापकाने मारहाण सुरूच ठेवल्याचा आरोप आहे. शाळेतील दुसऱ्या एका महिला शिक्षिकेने तात्काळ धावून येत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तरीही आरोपी मुख्याध्यापकाचा राग शांत झाला नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी मुख्याध्यापक जेरबंद; बडतर्फीची मागणी
या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिला शिक्षिकेला तात्काळ वाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपी मुख्याध्यापक धर्मेंद्र विष्णू दीक्षित याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार किरण इथापे करत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर वाई तालुका शिक्षक संघटना अत्यंत आक्रमक झाली आहे. “शाळेच्या आवारात, विद्यार्थ्यांसमोर महिला शिक्षिकेवर असा क्रूर हल्ला करणारी व्यक्ती शिक्षक म्हणवून घेण्याच्या लायकीची नाही. हा संपूर्ण शिक्षकी पेशाचा अपमान आहे,” अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त करत आरोपी मुख्याध्यापकाला तात्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास वाई तालुक्यातील सर्व शिक्षक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.