जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यातील गुलटेकडी भागातील डायस प्लॉट परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक खलील रज्जुलाल शेख (Khalil Shaikh) यांनी १५ जुलै रोजी राहत्या घरी आत्महत्या (Death Case) केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली, तसेच एक व्हिडिओ रेकॉर्ड करत यात अनेक धक्कादायक खुलासे केले. या व्हिडिओत आणि चिठ्ठीत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची नावे घेतल्याने प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. (Ravindra Dhangekar news)

या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी आणि बाळासाहेब शेडगे यांच्यासह एकूण १४ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खलील शेख यांच्या नातेवाईक सुलताना खलिल शेख (वय ५०) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
- प्रकरणातील ठळक मुद्दे :
- मृत्यूची घटना : १५ जुलै, गुलटेकडी (डायस प्लॉट), पुणे
- आरोपींची संख्या : १४ जण, यात रवींद्र धंगेकर व पत्नी, बाळासाहेब शेडगे यांचा समावेश
- गुन्हा दाखल : स्वारगेट पोलीस ठाणे
- पार्श्वभूमी : २०१५ पासून सुरू असलेला सेंट्रिंग व्यवसाय, आर्थिक भागीदारीतून वाद
- आरोप : वारंवार धमक्या, शिवीगाळ, मानसिक छळ आणि साहित्य बळजबरीने नेल्याचा दावा
- रक्कम : चिठ्ठी-व्हिडिओत अडीच कोटी रुपये थकीत असल्याचा उल्लेख; भागीदारांकडे सुमारे ५० लाख रुपये अडकल्याचाही आरोप
- कलम : आत्महत्येस प्रवृत्त करणे, साधारण १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
पुण्याचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल.” थकीत रकमेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आणि व्हिडिओत अडीच कोटी रुपये थकीत असल्याचे नमूद आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चिठ्ठी, व्हिडिओ आणि संबंधित आर्थिक कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आरोपींची चौकशी करण्यात येणार असून, प्रकल्पातील भागीदारांची नेमकी संख्या आणि व्यवहारांचे स्वरूप तपासात स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाला राजकीय वजनही आहे. रवींद्र धंगेकर यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता आणि सध्या ते पक्षाच्या पुणे महानगरप्रमुखपदी कार्यरत आहेत.
या गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यात अटकेची कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपासात आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीचा नेमका तपशील समोर येईल, असे पोलीस उपायुक्त मोहिते यांनी स्पष्ट केले.