Electric shock death latest news । महाराष्ट्रात विजेच्या शाॅकमुळे 7 जणांचा मृत्यू,महावितरणचा गलथान कारभार आला चव्हाट्यावर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Electric shock death latest news । महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत विद्युत शाॅकमुळे 7 जणांचा बळी गेला आहे. पुणे व सातारा जिल्ह्यातील घटना ताजी असतानाच, आज बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत विद्युत तारेचा शाॅक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Electric shock death latest news, Seven people died in Maharashtra due to the mismanagement of Mahavitaran, Seven people died due to electric shock in beed, satara, pune

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा परिसरातील राठोड वस्ती परिसरातील शेतात पडलेल्या विद्युत तारेला दोन मुले चिकटली होती, त्यांना वाचवण्यासाठी आई धावली होती, पण आईला सुध्दा शाॅक बसला. यात तिघांचा जागेवर मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी घडली.

या घटनेत ललिता श्रीकांत राठोड (वय 30), अभिजित श्रीकांत राठोड (वय 8), प्रशांत श्रीकांत राठोड (वय 11) या तिघा मायलेकरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तिघांचा नाहक बळी गेला आहे. यामुळे महावितरण विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

ललिता राठोड या दोन्ही मुलांसह आज दुपारी भेंडटाकळी तांडा शिवारातील आपल्या शेतात गेल्या होत्या. खेळत असताना दोन्ही मुलांचा खाली पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. दोघेही विजेचा धक्का बसल्याने कोसळल्याचे पाहून आई ललिता त्यांना वाचविण्यासाठी धावली. मात्र, त्यांना देखील विद्युत धक्का बसला. यात तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुण्यातही विद्युत शाॅक लागून चिमुकल्याचा मृत्यू

पाण्याची मोटर चालू करण्यास गेलेल्या एका चिमुकल्याचा विजेचा शाॅक बसुन मृत्यू होण्याची घटना पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे शुक्रवारी घडली होती. या घटनेत प्रणव रोहिदास निवंगुणे या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेत लोखंडी जिन्यात विद्युत प्रवाह उतरल्याने प्रणवचा मृत्यू झाला होता.

विजेच्या शाॅकमुळे साताऱ्यात तिघांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील तासवडे येथे विजेचा शाॅक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू होण्याची घटना शुक्रवारी घडली होती. शिंदे कुटूंबातील तिघांचा या घटनेत मृत्यू झाला होता.

राज्यात दोन दिवसांत सात जणांचे बळी

राज्यात गेल्या दोन दिवसांत विजेच्या शाॅकमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात 3, बीडमध्ये 3 तर पुण्यात 1 अश्या सात जणांचे बळी गेले आहेत. या सर्व घटनांमध्ये महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.