- Advertisement -

एसपी साहेब, अवघ्या सहा पोलिसांवर चालतेय तेवीस गावांची “पाटीलकी “

आष्टी । राजेंद्र जैन । एक अधिकारी अन् सहा पोलिस कर्मचाऱ्यांच्या बळावर तेवीस गावांचा कारभार हाकणारी बीड जिल्ह्यात एकमेव पोलिस चौकी आहे. ही कहाणी आहे आष्टी तालुक्यातील कडा पोलिस चौकीची.

कडा पोलिस चौकींतर्गत असणाऱ्या बावीस गावांची ‘पाटीलकी’ एक सहायक पोलिस निरिक्षकासह पाच सहा कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. दैनंदिन कामकाज पाहून ड्युटी करताना कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे.त्यामुळे 23 गावांच्या लोकसंख्येचा विस्तार पाहता कड्याला स्वतंत्र पोलिस स्टेशनची आवश्यकता निर्माण झाली आहे.

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील कड्याची बाजारपेठ व्यापारी वर्गाच्या दृष्टीकोणातून सर्वात मोठी म्हणून परिचित आहे. परिपुर्ण बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र,विविध शाळा, महाविद्यालये, बँका, पतसंस्था, हाॅस्पीटल याठिकाणी असल्यामुळे दैणंदीन कामासाठी परिसरातील पंचवीस ते तीस गावातील नागरीकांचा नियमित संपर्क असतो.

या चौकींतर्गत कडयासहीत लहान-मोठया अशा बावीस गावांचा विस्तार आहे. तर जवळपास पंचेचाळीस हजार लोकसंख्या अन् तीस किमी अंतराचा परिसर हद्दीत येतो. यामध्ये दोन शेरी, शिराळ, निमगाव चोभा, रुई नालकोल, केरूळ, नांदा, फत्तेवडगाव, घुमरी पिंपरी, खिळद, लिंबोडी आदी प्रमुख गावांचा समावेश येतो.

सध्या कडा पोलिस चौकीत एका सहायक पोलिस उपनिरिक्षकासह केवळ पाचच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी काहींना साहेबांच्या आग्रहास्तव नाहक आष्टीलाच ड्युटी करावी लागतेय. त्यामुळे एवढ्या गावांचा पसारा पाहता पोलिसांचे बळ अत्यंत तोकडे असून, या गावांची मदार अवघ्या बोटावर मोजण्या इतपत पोलिसांवर अवलंबून आहे. त्यामुळे अनेकदा कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवल्यास सामाजिक स्वास्थ धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते. अपु-या पोलिसांमुळे अनेक गावांत मोठ्या प्रमाणात मलाईदार धंदे जोमात आहेत.

हाॅटेल, ढाब्यांवर देशीविदेशी दारुची विक्री, काही लाॅजिंगवर वेश्या व्यावसाय, पत्यांचे क्लब, मटका, गांजा, वाळू तस्करी आदी बेकायदेशीर धंदे, वादविवाद, घरफोडी, शालेय, महाविद्यालयीन मुलींची सर्रास छेडछाड, बेशिस्त प्रवासी वाहतूक, बाजारात दुचाकी, मोबाईल चोरी यासारख्या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यास पोलिस अपयशी ठरत आहेत.

पोलिस कर्मचा- यांना कार्यक्रम, राष्ट्रीय सण- उत्सव ,यात्रा, अचानक बंदोबस्त, अपघात, तसेच दैणंदीन कामाबरोबरच विविध गुन्ह्याच्या तपास यासाठी कायम दक्ष राहावे लागते. त्यामुळे साहेबांचे काही लाडावलेले कर्मचारी वगळता, इतरांना अति कामाचा भार सोसावा लागत आहे.

या अगोदरच अनेकदा जनता दरबारात स्वत: एसपी साहेबांनी मुलींच्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नियुक्ती दिली. परंतू स्थानिक अधिका-यांनी दखल न घेता अंमलबजावणी केलेली दिसत नाही.

कडा पोलिस स्टेशन निर्मितीची मागणी मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

कडा गावाची लोकसंख्या,विस्तार अन समस्या दृष्टीक्षेपात ठेऊन कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशाने कडा शहराला स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख ॲड, भाऊसाहेब लटपटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात मागणी केेली आहे.

एसपी साहेब, जनता म्हणतेय कर्मचारी संख्या वाढवा

आष्टी तालुक्यातील कडा पोलिस चौकींतर्गत 23 गावे, पंचेचाळीस हजार लोकसंख्या अक्षरश: डोकेदुखी झाली. अन् एक पोलिस अधिकारी, पाच कर्मचारी मिळून अवघे सहाजण पाटीलकी करीत असल्याने अनेक गावांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. परिसरात मलाईदार अवैद्य धंदे वाढून सामाजिक स्वास्थ धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षक साहेबांनी कडा चौकीला कायमस्वरुपी अधिकारी, कर्मचारी वाढवून देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे