Sina River flood News : संकटग्रस्तांच्या आधारासाठी भूमिपुत्र मैदानात, सभापती राम शिंदेंनी केली कर्जत-जामखेड मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, प्रशासनाला दिले महत्वाचे निर्देश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख : नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार व प्रशासन खंबीरपणाने उभे आहे. दोन दिवसांत सर्व पंचनामे पुर्ण होतील.कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही.पंचनाम्यांचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर झाल्यानंतर तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करेल, कोणीही खचून जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ऐकमेकांना सहकार्य करा,पाऊस कमी होताच सीना नदीतील सर्व बंधाऱ्यांची दुरूस्ती हाती घेण्यात येईल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सीनाकाठावरील नुकसानग्रस्त गावांच्या पाहणी दौर्यावेळी शेतकऱ्यांना दिला.

सोमवारी सीना नदी व तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिनामाई कोपली होती, सीना नदीला आलेल्या महापुराच्या प्रकोपात नदीकाठच्या गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले. महापुर ओसरताच महापुराने केलेला वेदनादायी विध्वंस उघड झाला. महापुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी बुधवारी तातडीने नुकसानग्रस्त भागाचे दौरा केला. शेतकरी व नागरिकांना आधार दिला.भूमिपुत्रांने दिलेल्या या आधाराने संकटग्रस्तांना संकटातून सावरण्याचे बळ मिळाले.
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी तसेच जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यां समवेत सभापती प्रा राम शिंदे यांनी बुधवारी सकाळी सीना नदीकाठावरील कर्जत व जामखेड तालुक्यातील विविध नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या. नुकसानीची पाहणी केली. संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना आधार दिला. दोन दिवसाच्या आत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा, कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, पंचनामे करताना जर स्टाफ कमी पडत असेल तर इतर तालुक्यातील स्टाफ या तालुक्यात वर्ग करून तातडीने परिपूर्ण पंचनामे शासनाला सादर करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले.
आष्टी आणि वरच्या नगर भागात झालेल्या ढगफुटीमुळे दोन दिवसांपुर्वी सीना नदीला जो काही महापुर आला त्यामुळे सीना नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. उभी पिकं वाहून गेली. कांदा, उडीद, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, पिकांचे तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. महापुरामुळे जमीनी खरडून गेल्या आहेत. नागलवाडी,शितपुर, निंबोडी, तरडगाव, मलठण, चोंडी, आघी, दिघी, जवळा येथील सर्व बंधाऱ्यांचे भराव वाहून गेल्याने बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले. पाऊस संपताच बंधाऱ्यांची दुरूस्ती घेण्यात येईल, असे यावेळी प्रा राम शिंदे म्हणाले.
दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी बंधाऱ्यांत पाणी आडवले जाते. परंतू महापुरामुळे बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी आडवण्यासाठी २८ दिवसांचा अवधी राहिला आहे. सीना नदीवरील सर्व बंधाऱ्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. बंधाऱ्यांची तातडीने दुरूस्ती न झाल्यास ऑक्टोबर नंतर पाण्याची मोठी टंचाई सीना काठच्या गावांना भासणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून तातडीने बंधारे दुरूस्ती केले जातील. त्यासाठी जिल्हाधिकारी त्या विभागाशी समन्वय साधतील.महापुरामुळे काहींच्या घरात पाणी घुसले. संसारोपयी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या बाधित कुटूंबांना तातडीने मदत करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना दिल्या आहेत, असे यावेळी प्रा राम शिंदे म्हणाले.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर आणि सितपूर या गावांना शिंदे यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या आणि नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.
मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधा गंभीरपणे बाधित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांत पंचनामे करून त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत मिळावी आणि गावांतील दळणवळण सुरळीत व्हावे, यासाठी तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी शिंदे यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक माळूंदे, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उप अभियंता शशिकांत सुतार, उप अभियंता प्रशांत वाकचौरे, जामखेडचे प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पांडुळे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपा माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, जामखेड भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस पांडुरंग उबाळे, बापूसाहेब माने, मिलिंद देवकर, सचिन चोरगे, दिनेश शिंदे सह कर्जत व जामखेड तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील निंबोडी, तरडगाव आणि मलठण गावांमध्ये झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पूरपरिस्थितीत पिकांचे, चाऱ्याचे व रस्त्यांचे नुकसान तर झालेच, पण त्याचबरोबर अनेक जनावरांचे गोठे बाधित झाले असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जिल्हा परिषद शाळांवर आणि अनेक घरांवरच्या पत्र्यांचे छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या सर्व गोष्टींची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना त्वरित उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी शिंदे यांनी प्रशासनाला दिले.
जामखेड तालुक्यातील चोंडी, देवकर वस्ती आणि आघी गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रा राम शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाच्या अतितीव्रतेमुळे शेतजमिनी, पिके, जनावरांचे गोठे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, चौंडी येथील शिल्पसृष्टीच्या बुरुजाला पाणी लागले होते, तर चौंडीतील पुलावर तब्बल ७-८ फुट पाणी आलेले होते.अतिवृष्टीमुळे चोंडी ग्रामस्थांना झालेल्या यातना आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी शिंदे यांनी आजच्या भेटीत प्रत्यक्ष अनुभवल्या चोंडीतील रस्ते, बंधारे, शाळा यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी त्वरित हाती घेण्याचे निर्देश शिंदे यांनी प्रशासनाला दिले.