काळजाचा ठोका चुकवणारी घटना: अंधारात पुलाच्या खड्ड्यात दुचाकी कोसळली, जामखेडच्या २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पहाटेच्या अंधारात पुलाच्या चालू कामाचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट पुलाच्या खड्ड्यात कोसळून जामखेड येथील एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भातोडी (ता. आष्टी) लगतच्या नदीवरील पुलावर हा भीषण अपघात घडला. बालाजी विलास पगिरे (वय २५, रा. मतेवाडी, ता. जामखेड, ह.मु. पोकळे वस्ती, जामखेड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भातोडी फाटा ते हरिनारायण रोडवरील भातोडी लगत नदीवर सध्या पुलाचे काम सुरू आहे. मयत बालाजी पगिरे हा तरुण पहाटेच्या वेळी आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथून दुचाकीवरून जामखेडच्या दिशेने येत होता. भातोडी येथे नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळ आला असता, भीषण अंधार असल्याने त्याला पुलाच्या खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याची दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने बालाजीचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी भातोडी गावातील ग्रामस्थांची ये-जा सुरू झाल्यानंतर पुलाच्या खड्ड्यात दुचाकीसह एक तरुण पडल्याचे निदर्शनास आले. मयत बालाजी हा जामखेड येथील ‘अवधूत हॉटेल’मध्ये वेटर म्हणून काम करत होता. अपघातानंतर त्याच्या मोबाईलवर हॉटेल मालक काका निंबाळकर यांचा फोन आला. ग्रामस्थांनी तो फोन उचलून घडलेला सर्व प्रकार सांगितला. अपघाताची माहिती मिळताच हॉटेल मालक काका निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिका आणि आष्टी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून, आज दुपारी १:०० वाजेच्या सुमारास जामखेड येथील तपनेश्वर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मयत बालाजीच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.
या घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करत आहेत.