धक्कादायक: रोजच्या धमक्यांचा भयानक शेवट ! नागपूरच्या निशाने त्याचा वाजवला खतरनाक गेम, वाचून येईल अंगावर काटा!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता नागपुरातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. नवऱ्याकडून सतत मिळणाऱ्या ‘मारून टाकेन’ या धमक्यांना कंटाळून एका पत्नीनेच खतरनाक डाव रचला आणि गुंड नवऱ्याची सुपारी देऊन त्याचा थेट गेम वाजवला.

नागपूरच्या भांडेवाडी परिसरात शुक्रवारी गणेश बोरकर या सराईत गुंडाचा रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. अज्ञातांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे सुरुवातीला ही हत्या गँगवॉरमधून झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय होता. मात्र, तपासाची चक्रे फिरताच या थरारक मर्डर मिस्ट्रीला वेगळेच वळण लागले आणि या हत्येमागे गँगवॉर नसून त्याची पत्नी ‘निशा’ मास्टरमाईंड असल्याचे उघडकीस आले.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृतक गणेश बोरकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्या जाचाला आणि क्रूर स्वभावाला कंटाळून पत्नी निशा ही त्याच्यासोबत न राहता आपल्या माहेरी राहत होती. पण तिथेही गणेशने तिचा पिच्छा सोडला नाही. तो निशाला वारंवार त्रास देत असे आणि जीवे मारण्याची धमकी देत असे.
रोजच्या या मरणयातना आणि सततच्या धमक्यांना कंटाळून अखेर निशाने नवऱ्याचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिने सुपारी देऊन गणेशची हत्या घडवून आणली. भांडेवाडीत घडलेल्या या घटनेनंतर नागपूर गुन्हे शाखा (क्राईम ब्रांच) आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे वेगाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान संशयाची सुई निशाकडे वळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. चौकशीत तिने आपला गुन्हा कबूल केला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मास्टरमाईंड पत्नी निशा आणि गुन्ह्यातील एका मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर, यातील आणखी एक आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या धक्कादायक घटनेविषयी अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी सांगितले की, “मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस आता या संपूर्ण घटनेचा अधिक सखोल तपास करत आहेत.”