धक्कादायक! बायकोचा क्रुर खेळ, नवऱ्याला थेट गाडले बाथरूमच्या फरशीखाली,४५ दिवस पचवला खून, अखेर असा झाला पर्दाफाश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण ताजं असतानाच उत्तर प्रदेशातील आग्रा येथून आणखी एक धक्कादायक हत्याकांड समोर आलं आहे. सिकंदरा पोलीस ठाणे हद्दीतील रेणुका धाम कॉलनीत राहणाऱ्या रुबी शर्मा हिने आपल्या पती सुरेंद्र शर्मा (वय ४५) याची हत्या करून मृतदेह घराच्याच बाथरूममध्ये पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ४५ दिवस पती बेपत्ता असल्याचा बनाव करत तिने नातेवाईक व शेजाऱ्यांची दिशाभूल केली.

Surendra Sharma murder case Agra, Ruby Sharma news

रूबी शर्मा ही पती सुरेंद्र, आणि दोन मुलींसह रेणुका धाम कॉलनीत राहत होती. सुरेंद्रला दारूचं व्यसन होतं, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. १८ मे रोजी सुरेंद्र अचानक बेपत्ता झाला. सुरुवातीला रुबीने स्वतःच नातेवाईकांसोबत शोध घेतल्याचा दिखावा केला आणि २६ मे रोजी सिकंदरा पोलीस ठाण्यात गुमशुदगीची तक्रार दाखल केली.

असा उघडकीस आला पर्दाफाश

सुरेंद्रविरोधात नोंद असलेल्या एका ट्रक चोरी प्रकरणाच्या पडताळणीसाठी पोलीस घरी पोहोचले. यावेळी रुबीची घाबरगुंडी आणि संशयास्पद वागणूक बघून पोलिसांना शंका आली. कसून चौकशी केल्यानंतर रुबीने गुन्हा कबूल केला आणि पतीची हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरल्याची कबुली दिली.

रुबीच्या निशाणदेहीवरून पोलिसांनी बाथरूम खोदकाम सुरू केलं. काही वेळातच जमिनीत पुरलेला सुरेंद्रचा मृतदेह सापडला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी रुबीने सासू आणि दोन्ही मुलींना नातेवाईकांकडे पाठवलं होतं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

रुबी परिसरात शिवणकाम करण्यासाठी ओळखली जात होती आणि महिलांमध्ये लोकप्रिय होती. त्यामुळे तिने असं कृत्य केलं असेल यावर शेजाऱ्यांचा विश्वास बसत नाहीये.
तपास सुरूच

हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही — कौटुंबिक वाद, संपत्तीचा वाद की आणखी काही, याचा पोलीस सर्व अंगांनी तपास करत आहेत. रुबीला या कटात आणखी कुणाची साथ होती का, हेही तपासलं जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.