एलसीबीचा अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ३४ जणांवर गुन्हे दाखल, ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकांनी नेवासा, नगर तालुका, राहाता आणि लोणी पोलीस ठाणे हद्दीत टाकलेल्या धाडीत ६ लाख ५९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या पथकांनी जुगार अड्डे व अवैध दारू धंदे उद्ध्वस्त करत तब्बल ३४ संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. एलसीबीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणून गेले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी आज (०५ जुलै रोजी) जिल्ह्याच्या विविध भागात धडक कारवाया केल्या. यामध्ये नेवासा तालुक्यातील एका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त करत ९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या कारवाईत २४८० रूपयांची देशी दारू जप्त करण्यात आली असून एक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरातीर सावेडीतील अवैध दारू विक्री विरोधात केलेल्या कारवाईत एका जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्याकडून ३१६० रूपयांची विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे. तर रूई छत्तीसी येथे टाकलेल्या धाडीत ९७२५ रूपयांची विदेशी दारू जप्त करत एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

राहता तालुक्यातील मोठ्या जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत ४ लाख ३६ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून १३ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर लोणी पोलिस स्टेशन हद्दीतील दुसऱ्या एका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत ९ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल करत तब्बल १ लाख ३७ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात बोकाळलेल्या अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या टीमने कंबर कसली असून कारवायांचा धडाका सुरु केला आहे.

आज ५ रोजी केलेल्या कारवाईच्या पथकात १) पोउपनि/संदीप दरवडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, योगेश कर्डीले, २) पोउपनि/विकास जाधव, पोलीस अंमलदार रिर्चर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमिझराजा आतार, ३) पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, अमोल आजबे, महादेव भांड, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, ४) पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार राहुल डोके, सतिष भवर, विशाल तनपुरे, मनोज साखरे, चंद्रकांत कुसळकर यांचा समावेश होता.