हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील दोघा चिमुकल्यांवर काळाची झडप; कर्जतच्या निंबोडी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने चिरडले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील निंबोडी फाटा येथे शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला. ईरटीगा कारने सायकलला चिरडल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चैतन्य छगन उदमले (वय १० वर्षे) आणि ओंकार बापू उदमले (वय १२ वर्षे) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. (Karjat Accident Nimbodi Phata)

मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य आणि ओंकार हे दोघे शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास निंबोडी फाटा परिसरातून सायकलवरून जात होते. त्याचवेळी श्रीगोंदा येथून जामखेडच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या ईरटीगा कारने (क्रमांक MH04 JB 2204) त्यांच्या सायकलला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून सायकलचाही अक्षरशः चुराडा झाला आहे.हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वर झाला.
या अपघातात दोन्ही मुले गंभीर जखमी झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दोघांची प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. परंतू दोघांचा जीव वाचवण्यात यश आले नाही.
अरणगाव येथील निलेश निगुडे यांच्या रुग्णवाहिकेतून दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. उदमले कुटुंबातील अवघ्या १० आणि १२ वर्षांच्या दोघा चिमुकल्यांवर अशा प्रकारे काळाने घाला घातल्याने उदमले कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण निंबोडी व कर्जत परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
