Savitribai phule Jayanti 2025 : शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि जीवन प्रवास नेमका कसा होता ? जाणून घ्या
Savitribai Phule Jayanti 2025 : देशातील पहिल्या शिक्षिका, समाजसेविका, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव (Naigaon Satara) येथे झाला. सावित्रीबाई फुले यांची जयंती (Savitribai Phule jayanti ) दरवर्षी ३ जानेवारी या दिवशी देशभर साजरी केली जाते.सावित्रीबाई फुले यांनी घेतलेल्या कठोर कष्टामुळे महिलांना शिक्षणाचा हक्क मिळाला.यंदा सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता ? जाणून घेऊयात.
सावित्रीबाई यांचा विवाह महात्मा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्याशी १८४० मध्ये झाला होता, विवाह समयी त्या फक्त ९ वर्षाच्या पर ज्योतिबा फुले १३ वर्षांचे होते. लग्नावेळी सावित्रीबाई ह्या निरक्षर होत्या, परंतू शिक्षणाची त्यांची तळमळ पाहून ज्योतिबा फुले प्रभावित झाले आणि त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यांनीच सावित्रीबाईंना शिकवले.
गरिब कुटूंबांत सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता. पुर्वीच्या काळी दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. पण सावित्रीबाई फुले यांनी या सर्व गोष्टींविरोधात लढा देत आपले शिक्षण पुर्ण केले. त्यांना समाजात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला पण त्यांनी न डगमगता आपले शिक्षण सुरु ठेवले. शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षिका होण्याकरिता पुणे व अहमदनगर येथे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्या शिक्षिका बनल्या.
सावित्रीबाई फुले शिक्षण कार्य
सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा फुले यांच्याशी झाला होता. महात्मा फुले हे समाजात सुधारणा घडावी यासाठी आग्रही होते. त्यांच्याच पाठबळावर सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. ही शाळा सुरु केल्यानंतर फुले दाम्पत्याला प्रचंड त्रास देण्यात आला. ते ज्या रस्त्याने शाळेवर जायचे त्या रस्त्यावर घाण टाकली जायची, सावित्रीबाईंच्या अंगावर शेण टाकले जायचे. दगड मारले जायचे. प्रचंड त्रास होत असतानाही त्या तुसभरही मागे हटल्या नाहीत. त्यांनी समर्थपणे मुलींची शाळा चालवून दाखवली. त्यांना त्याकाळी फातिमा शेख यांची मोलाची साथ मिळाली. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी उचलेल्या पावलामुळे देशात मुलींसाठी अनेक शाळा उघडल्या. त्यांच्या या कार्यामुळे इंग्रजही प्रभावित झाले होते.
सावित्रीबाई फुले सामाजिक कार्य
सावित्रीबाई फुले ह्या सती प्रथेविरोधातील चळवळीत सक्रीय होत्या. त्यांनी ज्योतिबा फुले यांच्यासमवेत सती प्रथेविरोधातील अंदोलनात जोरदार आवाज उठवला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या लढ्यामुळे भारतातील मुली आज मुक्तपणे शिक्षण घेत आहेत.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी 1848 ते 1851 दरम्यान अठरा शाळा स्थापन केल्या. 17 फेब्रुवारी 1852 रोजी पहिली-वहिली वार्षिक शालेय परीक्षा घेण्यात आली. अशाप्रकारे सत्यशोधक समाजाची स्थापना आणि विधवांसाठी मदत, इतर मानवतावादी सेवांबरोबरच, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी यथोचित सेवा केली.
सावित्रीबाई फुले कविता
सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचितांच्या विकासासाठी, अस्पृश्यांना समाजात समान अधिकार मिळवून देण्यासाठी आणि तत्कालीन जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी समर्पित केले. त्यांनी आपल्या लेखणीतून तसेच कवितेतून तत्कालीन समाजावर आसूड डागले. सावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता आहे… ती म्हणजे “तयास मानव म्हणावे का?’
त्यात ते म्हणतात-
तयास मानव म्हणावे का?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?
दे रे हरी पलंगी काही
पशूही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का?…
त्यांच्या कवितेतील या संक्षिप्त ओळी आयुष्यात शिक्षण किती महत्वाचे आहे याची जाणीव करू देते.
10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास एका धगधगत्या क्रांतिज्योती समानच आहे, त्यामुळे आजही त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रकाश आपल्या सर्वांवर आहे, आणि यापुढेही असेल यात शंका नाही.
सावित्रीबाई फुले कार्य
सावित्रीबाई फुले ह्या देशातील पहिल्या आधुनिक स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या.
बालविवाह व सती प्रथेविरोधात त्यांनी प्रखरपणे लढा दिला.
महिलांना शिक्षणाचा हक्क असावा याकरिता सावित्रीबाई अखेरपर्यंत लढत राहिल्या, मुलींसाठी स्वतंत्र शाळा उघडण्यासाठी त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासमवेत पुढाकार घेतला आणि पुण्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यांनी मुलींसाठी एकुण १७ शाळा उघडल्या होत्या.
सावित्रीबाई फुले यांनी महिल्यांच्या हक्कासाठी लढा देत असतानाच जातिव्यवस्थेच्या प्रथेविरोधात प्रखर लढा दिला.
अस्पृश्यतेला त्यांचा प्रखर विरोधात होता, या प्रथेविरोधात आवाज उठवत असताना त्यांनी स्वता:च्या घरातील विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली होती. त्यांचा अस्पृश्यांना कायम पाठिंबा असायचा.
सावित्रीबाई फुले ह्या समाजसेवक शिक्षिका होत्या, त्याचबरोबर त्या कवयित्री सुध्दा होत्या, त्यांच्या कवितेतून निसर्ग, शिक्षण, जातीव्यवस्था निर्मूलन याविषयावर भाष्य होत असायचे.
सावित्रीबाई फुले यांनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरु केले होते.
विधवांचे दु:ख कमी करण्यासाठी त्यांनी सतत आवाज उठवला, महिला विधवा झाल्यास तीचे मुंडन करण्याची प्रथा होती, ही प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी न्हाई संघटीत करून संप पुकारला. यामुळे विधवांच्या मुंडनाचा मुद्दा ऐरणीवर आला. या प्रथेविरोधात आवाज बुलंद करण्याचे काम झाल्याने या प्रथेला आळा बसला.
मुलांनी शाळेत नियमित यावे याकरिता, त्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे याकरिता सावित्रीबाईंनी मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरु केली होती.
ज्या काळात भारतीय समाजात जातीव्यवस्था जन्मजात होती त्या काळात त्यांनी आंतरजातीय विवाह प्रोत्साहन दिले. आपल्या पतीसोबत त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी अनेक सत्यशोधक विवाह लावले