पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत पार पडली उच्चस्तरीय बैठक, सभापती राम शिंदे यांनी प्रशासनाला दिले महत्वपूर्ण निर्देश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या विविध प्रश्नांसंदर्भात विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थित मुंबई येथील विधान भवनात आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

विद्यापीठ क्षेत्राच्या चारही बाजूस वनविभागाचे आरक्षण असल्याने येण्या-जाण्यासाठी रस्ता बांधण्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी येत्या आठ दिवसात वनविभाग, महसूल आणि विद्यापीठ अधिकारी यांच्याशी समन्वयातून कार्यअहवाल तयार करावा. तसेच विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा निर्मितीचे कार्य 15 मे, 2025 पर्यंत पूर्ण व्हावे तसेच 80/20 सूत्रानुसार विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत असे निर्देश यावेळी सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

31 मे, 2025 रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती आहे. या संदर्भातील उपक्रम आणि कामे वेळेत पूर्ण व्हावीत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण होणे अपेक्षित आहे. या बैठकीत याबाबत चर्चा झाली.

विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टिने वनविभागाच्या अटी – शर्ती नुसार पुढील एक महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण व्हावी तसेच अपेक्षित कार्यवाहीच्या दृष्टिने जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी सर्व संबंधित घटकांशी चर्चा – समन्वय करुन आठ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करावा आणि पुढील कार्यवाही पूर्ण करावी, असे यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आदेशीत केले.

बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, कुलगुरु प्रा.प्रकाश महानवर, दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्यासह तीनही विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.