जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जागतिक आरोग्य दिनानिमित्त हाळगावच्या शासकीय कृषि महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयातील एकूण २५ कर्मचारी व १६० विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सदरचे शिबिर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.अनिल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथिल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करून विविध रक्त चाचण्यांसाठी रक्त नमुने घेण्यात आले.

तसेच, दैनंदिन जीवनात संतुलित आहार, योग, व्यायामाचे महत्व यावर आरोग्य शिक्षण देण्यात आले. सदर शिबिरात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, कॅल्शियमचे प्रमाण, थायरॉईड, यकृत व मुत्र पिंडाची कार्य, हृदयरोग तपासणीमध्ये लिपिड प्रोफाईल, रक्तातील साखरेचे प्रमाण अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या सर्व तपासण्या विद्यार्थ्यांना त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी व अधिकारी व कर्मचारी यांचे दैनंदिन आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतील.

कार्यक्रमास विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. गोकुळ वामन, डॉ. मनोज गुड, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक वाळुंजकर, सहाय्यक ग्रंथपाल महादू शिंदे, शारीरिक शिक्षण निर्देशक अविनाश हांडाळ, मिश्रक शशिकांत कांबळे उपस्थित होते.

जामखेड तालुका आरोग्य अधिक्षक डॉ. सुनील बोराडे, अरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन रेडे, डॉ. अजिंक्य धाडगे, डॉ. संजीवनी बारस्कर, आरोग्य निरीक्षक सुधाकर राख, आरोग्यसेवक राजेंद्र बांगर, आरोग्यसेविका राणी नागरगोजे, हाजाराबी शेख, महालॅब टेक्निशिअन सुरेश यादव व अमोल नागवडे यांच्या पथकाने वैद्यकीय तपासणी केली. महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक वाळुंजकर व मिश्रक शशिकांत कांबळे यांनी शिबिराच्या आयोजनामध्ये विशेष मेहनत घेतली. सदर शिबिरास विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला.