Ram Shinde Delhi tour news : विधानपरिषदचे सभापती प्रा. राम शिंदे दिल्ली दौर्यावर, राम शिंदे यांनी घेतली जे.पी नड्डा आणि स्मृती इराणी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सभापती प्रा.राम शिंदे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची आज मंगळवारी दिल्लीत सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सभापतीपदाचा उपयोग केला जाईल असा शब्द शिंदे यांनी यावेळी पक्ष नेतृत्वाला दिला.
विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे हे सोमवारपासून दिल्ली दौर्यावर आहेत. सोमवारी रात्री शिंदे हे सहकुटुंब दिल्लीत दाखल झाले. आज मंगळवारी प्रा राम शिंदे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची सहकुटुंब भेट घेतली.यावेळी त्यांच्यासमवेत मातोश्री भामाबाई शिंदे, पत्नी आशाताई शिंदे, कन्या डाॅ अन्विता शिंदे, चिरंजीव अजिंक्य शिंदे उपस्थित होते.
विधानपरिषद सभापतपदी निवड झाल्यानंतर प्रा राम शिंदे यांनी आज प्रथमच जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.यावेळी नड्डा यांनी प्रा शिंदे यांचे अभिनंदन करत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जे.पी. नड्डा यांनी शिंदे कुटुंबियांचे मनोभावे स्वागत करत आस्थेवाईकपणे चौकशी केली.
या भेटीबाबत सभापती प्रा शिंदे यांनी सोशल मीडियावर माहिती जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा जी यांची आज सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. विधानपरिषद सभापती पदी निवड झाल्यानंतरची ही प्रथमच भेट असल्या कारणाने त्यांनी माझे अभिनंदन करून मला मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाने मला सभापती पदाची महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त केले. या पदाचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी होईल असा शब्द त्यांना दिला. असे म्हटले आहे.
कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते प्रा राम शिंदे यांनी सरपंच ते विधानपरिषद सभापतीपद मोठ्या संघर्षातून मिळवले. पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास पक्ष सामान्य कार्यकर्त्यालाही मोठ्या उंचीवर घेऊन जातो याचेच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रा राम शिंदे हे होय. शिंदे यांना पक्षाने विधिमंडळाच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी दिली आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल प्रा शिंदे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन आभार मानले.
जे.पी नड्डा यांच्या भेटीनंतर प्रा शिंदे यांनी भाजपाच्या जेष्ठ नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतली. या भेटीत स्मृती इराणी यांनी प्रा राम शिंदे यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेत आपुलकीने संवाद साधला.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्या विशेष मार्गदर्शनाची साथ मला नेहमी मिळत आलेली आहे. ही आपुलकी आणि आजची भेट सदैव स्मरणात राहील.त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा नेहमीप्रमाणे प्रेरणादायी ठरला.या भेटीसाठी आणि शुभेच्छासाठी मा.स्मृती इराणी जी यांचे मनःपूर्वक आभार अशी भावना प्रा शिंदे यांनी व्यक्त केली.
स्मृति इराणी यांच्या भेटीनंतर प्रा शिंदे यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली. या भेटीत तावडे यांनी प्रा शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत सत्कार केला. तावडे यांनी शिंदे यांना मोदी20 हे पुस्तक भेट दिले.या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध विषयांवर तसेच संघटनात्मक बांधणी सकारात्मक चर्चा झाली.
राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर असताना बीबीसी मराठीच्या कार्यालयाला प्रा राम शिंदे यांनी भेट दिली. मुळचे कर्जतचे असलेले बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्या टीमशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी अभिजीत कांबळे यांनी त्यांच्या आई रत्नाताई कांबळे यांनी लिहिलेलं “पारंबी आरोग्याच्या वटवृक्षाची” हे पुस्तक शिंदे यांना भेट दिलं. रत्नाताई कांबळे यांचं आरोग्य क्षेत्रातील काम सर्वांना प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे हे आपल्या दिल्ली दौर्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक मान्यवरांच्या भेटी घेऊन आशिर्वाद घेणार आहेत.