Jamkhed News : ज्यांनी अहिल्यादेवींची निस्वार्थ आणि निरपेक्षपणे सेवा केली त्यांना आयुष्यात कधीच कमी पडत नाही – आशाताई शिंदे, चोंडीत मोठ्या उत्साहात पार पडले सत्यशोधक महिला संमेलन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : “ज्यांनी अहिल्यादेवींची निस्वार्थ आणि निरपेक्षपणे सेवा केली त्यांना आयुष्यात कुठेही कमी पडले नाही, सत्यशोधक महिला संमेलनाच्या माध्यमांतून आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आशिर्वाद घेऊन जाणार आहात, तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला भरभरून मिळाल्याशिवाय राहणार नाही.तुम्हाला तुमच्या जीवनात आणि समाजकार्यात कुठेही काहीही कमी पडणार नाही, हा मला ठाम विश्वास आहे.अहिल्यादेवींसह सावित्रीबाई फुले व सर्व महामानवांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी सत्यशोधक महिला महासंघाने हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांनी केले.”
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील चोंडी येथे सत्यशोधक महिला महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने सत्यशोधक महिला संमेलनाचे ५ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून आशाताई शिंदे ह्या होत्या.यावेळी आयोजित संमेलनात त्या बोलत होत्या. यावेळी या संमेलनाच्या आयोजिका वंदनाताई वनकर यांचे विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे व पत्नी आशाताई शिंदे यांच्या हस्ते सत्कार करत गौरव करण्यात आला.
माजी सभापती आशाताई शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म चोंडी गावातील सामान्य शेतकरी कुटूंबात झाला.त्यांचे वडिल गावचे पाटील होते. कोणाचा कुठे जन्म होतो यावरून त्याचे कर्तृत्व ठरत नसते. तर तो व्यक्ती आपल्या जीवनात काय कार्य करतो यावर त्याचे कर्तृत्व ठरते. अहिल्यादेवी होळकर घराण्याच्या सुन झाल्या. त्यांना राजसत्तेची संधी आली. या संधीचे सोने त्यांनी केले. जनतेच्या हिताचे कारभार केला. आपल्या राज्यापुरता कारभार न करता संपूर्ण देशात सामाजिक कार्य उभे केले.
अहिल्यादेवी होळकर यांनी शौर्य, प्रगल्भ नेतृत्व आणि सामाजिक न्यायासाठी आपले जीवन समर्पित केले, आजही त्यांचे महान कार्य संपूर्ण देशाला प्रेरित करीत आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या अजरामर कार्याने विविध क्षेत्रांमध्ये आदर्श निर्माण केला. त्यांचे नेतृत्व, त्यांची माणुसकी आणि धार्मिक सहिष्णुतेचा त्यांचा दृष्टिकोन आजही प्रत्येकाच्या मनात ठळक आहे. एका महिलेने मनात आणले तर ती किती मोठे महान कार्य उभी करू शकते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवींचे कार्य होय, असे आशाताई शिंदे म्हणाल्या.
चोंडीच्या मातीत जन्मलेली लेकीने कर्तृत्वाच्या बळावर संपुर्ण भारत देशात महान कार्य उभे करत नवा आदर्श निर्माण केला, अहिल्यादेवींचे कार्य आजही समाजासाठी दिशादर्शक आणि प्रेरणा देणारे आहे.आम्हा माहेरच्या वारसांसाठी आणि संपुर्ण चोंडी ग्रामस्थांसाठी ही बाब गौरवास्पद आहे. कितीही मोठे संकट येऊ द्या, खचून न जाता अहिल्यादेवींचा आदर्श नजरेसमोर ठेवा आणि संघर्ष करायला तयार रहा. तुमचा विजय निश्चितपणे होईल, असे शिंदे म्हणाल्या.
यावेळी सत्यशोधक महिला संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा रंजनाताई कांबळे, प्रा सविता हजारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्मिताताई पानसरे, डाॅ अशोक चोपडे, प्रा डाॅ प्रल्हाद लुलेकर, डाॅ विणा राऊत, स्वाती पाटील, प्रा कविता म्हेत्रे, ॲड वैशाली डोळस, सह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सत्यशोधक महिला महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने ५ जानेवारी रोजी चोंडीत अहिल्यादेवी होळकर यांच्यासह महामानवांच्या विचारांचा जागर करण्यात आला. संपुर्ण दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. संमेलन अतिशय उत्साहात पार पडले. सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या सामाजिक संघटनांचे महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने सत्यशोधक महिला संमेलनासाठी चोंडीत आले होते. राज्यभरातून आलेल्या या सर्वांसाठी विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.