राष्ट्रपती ३१ मे रोजी चोंडीत येणार;चौंडी विकास आराखडा मंजुरीचा शासन निर्णय येत्या सोमवारी निघणार – सभापती प्रा राम शिंदे

जामखेड टाइम्स वत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी (ता.जामखेड) राष्ट्रीय स्मारक होण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून, त्याचाच भाग म्हणून चोंडी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या 681 कोटींच्या चौंडी विकास आराखड्याचा शासन निर्णय येत्या सोमवारी जाहीर होईल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

President dropadi murmu to visit Chondi on 31 may 2025 , Government decision to approve Chondi development plan will be taken on Monday - Chairman Prof Ram Shinde

येत्या 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाला राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या चौंडी भेटीच्या अनुषंगाने आवश्यक प्रोटोकॉल तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर सभापती प्रा. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ सदस्यांनी अहिल्यादेवींना अभिवादन केले आहे व तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांच्या विकासासाठी पाच हजार कोटींचा निधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याअंतर्गत चौंडीच्या विकासासाठी 681 कोटींचा निधी मिळणार आहे. त्याचा शासन निर्णय येत्या सोमवारी किंवा मंगळवारी जाहीर होईल. चौंडी गाव हे राष्ट्रीय स्मारक करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला असून, त्यादृष्टीने हालचाल सुरू झाली आहे व त्याचाच भाग म्हणून चौंडी विकासाला भरघोस निधी मिळणार असल्याचे यावेळी प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी चौंडीत 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जयंती महोत्सव होतो. पण यंदाचा जयंती महोत्सव तीनशेवा असल्याने तसेच राष्ट्रपतींसह राज्यपाल सी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास येणार असल्याने तेथील आवश्यक सुविधा व प्रशासकीय तयारीबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस अधीक्षकांसमवेत आढावा बैठक घेतली आहे.

यंदाच्या जयंती महोत्सवासाठी राज्यभरातून व देशभरातून लाखो नागरिक चौंडीला येणार असल्याने त्या गर्दीच्या दृष्टीनेही तसेच सध्याचे पावसाळ्याचे वातावरण पाहता त्या अनुषंगानेही नियोजनाच्या सूचना दिल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, 31 मे रोजीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने चौंडीत मंडप, स्टेज, ग्रीन रुम, आसन व्यवस्था, प्रसाधनगृह, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, ध्वनीक्षेपक व विद्युतीकरण, वातानुकूलिन कक्ष, सुरक्षा बॅरिकेडींग आदी सुविधांची कामे सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.