pradhan mantri awas yojana नाशिक विभागात जामखेड पंचायत समितीचा डंका : विभागीय आयुक्तांच्या हस्ते गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांना पारितोषिक प्रदान
आमदार रोहित पवारांच्या नियोजनातुन महाआवास अभियानांतर्गत पटकावला दुसरा क्रमांक
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत जामखेड तालुक्याने विभागीय स्तरावर बाजी मारत दुसरा क्रमांक पटकावला. सोमवारी जामखेड तालुक्याला विभागीय स्तरावरील व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक नाशिक विभागीय आयुक्तांच्या हस्ते जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांना प्रदान करण्यात आले.
महाआवास अभियानांतर्गत जामखेडच्या पंचायत समितीने राज्य पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्हास्तरीय सर्वोतकृष्ट तालुका म्हणुन १०० पैकी ७५.२० गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला होता. 30 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जामखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी सर्व कर्मचार्यांना सोबत घेत केलेल्या नियोजनाचा मोठा फायदा झाला. सर्वांनी एकजुटीने केलेल्या कामामुळे जामखेड पंचायत समितीने नाशिक विभागात दुसरा क्रमांक पटकावण्यात यश मिळवले.
महाआवास अभियान ग्रामीण (pradhan mantri awas yojana )
‘केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच गुणात्मक प्रगती व्हावी’ या उद्देशाने दि.२० नोव्हेंबर २०२० रोजी ‘राष्ट्रीय आवास दिनाचे’ औचित्य साधून राज्यात १०० दिवसांचे ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ आयोजित करण्यात आले होते.या अभियानांतर्गत पंचायत समितीने रमाई आवास योजना,पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून सहा महिन्यात जामखेड पंचायत समितीने ७९१ घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण केले होते.
आमदार रोहित पवारांच्या नियोजनाला मिळाले फळ
कर्जत – जामखेड विधानसभा मतदार संघातील गोरगरीब वंचित कुटुंबांना आपल्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी आमदार रोहित पवार यांनी महाआवास अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण घरकुल निर्मितीला गती दिली. घरकुल मंत्री व निधी येणार्या अडचणी सोडवण्यासाठी मंत्रालयात सतत पाठपुरावा केला. दोन्ही पंचायत समितीतील संबंधित अधिकारी-पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन नियोजन केले होते. योग्य नियोजन व पाठपुराव्यामुळे जामखेड तालुका विभागीय स्तरावर दुसरा आला. आमदार पवारांच्या पाठपुराव्यातून अनेकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न महाआवास अभियानातून पुर्ण झाल्याने जनतेत आनंदाचे वातावरण आहे.