अहमदनगर जिल्ह्यासाठी नाशिकमध्ये नवे जातपडताळणी कार्यालय सुरू | New caste verification office started in Nashik for Ahmednagar district

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । नाशिक व अहमदनगर जिल्हयाकरिता आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणीसाठी (caste verification) नाशिक येथे एकच कार्यालय कार्यान्वित होते. समितीतील प्रकरणांचा वाढता ओघ पाहता व लाभार्थ्यांच्या सोयीकरिता शासनाने 13 सप्टेंबर, 2019 च्या निर्णयान्वये नाशिक-2 हे नवीन जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार 10 जानेवारी, 2022 पासून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक-2 हे नवीन कार्यालय नाशिकमध्ये सुरू करण्यात आले आहे. (New caste verification office started in Nashik for Ahmednagar district)

या नवीन समितीच्या कार्यक्षेत्रात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला, सिन्नर हे तालुके व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुके यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. नवीन नाशिक-2 समितीचे कामकाज आदिवासी विकास भवन, गडकरी चौक, नाशिक येथून सुरू करण्यात आले आहे.

संबंधित तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना (caste certificate verification online) तसेच या कार्यक्षेत्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी सेवाविषयक बाबी बाबत पत्रव्यवहार करताना तो सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक-2, दुसरा मजला, गडकरी चौक, आदिवासी विकास भवन, नाशिक-422002 या नावाने करावा असे आवाहन किरण माळी, सहआयुक्त तथा अनूसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.