“बारामतीचा निळू फुले, अरे कुठे हरवला होतास इतकी वर्षे?”.. अजितदादांचे ते शेवटचे शब्द, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने जागवल्या हृदयस्पर्शी आठवणी”

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : “अरे हा, तू बारामतीचा निळू फुले! अरे पठ्ठ्या कुठे हरवला होतास इतकी वर्षे?”… हे शब्द होते राज्याचे लाडके नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे. आज दादा आपल्यात नाहीत, ही वार्ता पचवणे अवघड जात असतानाच, त्यांच्या एका निस्सीम कार्यकर्त्याने आणि पोलीस दलातून निवृत्त झालेल्या रऊफ शेख या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या लाडक्या ‘दादां’च्या हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला आहे. १९८५ पासून सुरू झालेला हा ३८ वर्षांचा ऋणानुबंध आज केवळ आठवणींच्या रूपात उरला आहे.

nilu fule of Baramati, oh where were you lost for all these years?"Those were last words of ajitdada pawar, police officer expressed his heartwarming memories,

​१९८५ ची निवडणूक आणि ‘बारामतीचा निळू फुले’

​रऊफ शेख यांच्या आठवणींचा प्रवास सुरू होतो १९८५ च्या विधानसभा निवडणुकीपासून. बारामतीच्या शाहू हायस्कूल आणि टीसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना, रऊफ शेख हे प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची हुबेहूब मिमिक्री करायचे. शरद पवार साहेबांच्या प्रचारात काहीतरी वेगळे करण्याच्या जिद्दीने त्यांनी निळू फुलेंच्या आवाजात प्रचाराची तयारी केली.

​त्यावेळी पंचवीसीत असलेले तरुण तडफदार अजितदादा रऊफ शेख यांच्यातील कलावंताला ओळखणारे पहिले व्यक्ती ठरले. रऊफ शेख सांगतात, “दादांचे ते काळेभोर केस, पांढरे शुभ्र कपडे आणि डोळ्यावरचा गॉगल आजही डोळ्यासमोर आहे. मी घाबरलो होतो, पण दादांनी धीर दिला- ‘अरे बाबा घाबरू नकोस, चल सुरू कर!’ माझं सादरीकरण ऐकल्यावर त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि माईक हातात देऊन थेट प्रचाराच्या ट्रकवर चढवलं. ती पाठीवरची थाप आजही मला स्फूर्ती देते.”

​पवार साहेबांसमोर दिलेली ती ‘पावती’

​निवडणुकीच्या रणधुमाळीत रऊफ शेख यांच्या आवाजाची चर्चा साहेबांपर्यंत पोहोचली. साहेबांच्या निवासस्थानी गर्दीतही दादांनी रऊफ यांना ओळखले आणि कौतुकाने साहेबांना सांगितले, “काका, हा बारामतीचा निळू फुले आहे!” एका सामान्य कार्यकर्त्याला थेट दिग्गज नेत्यासमोर उभे करून त्याला संधी देण्याचे मोठेपण केवळ अजितदादाच दाखवू शकत होते.

​३८ वर्षांनंतरही तोच स्पर्श आणि तीच आपुलकी

​काळ बदलला, रऊफ शेख पोलीस दलात भरती झाले, पण दादांवरील प्रेम कमी झाले नाही. दोन वर्षांपूर्वी अहिल्यानगरच्या विश्रामगृहात तब्बल ३८ वर्षांनंतर त्यांची दादांशी भेट झाली. गर्दी असूनही, रऊफ यांनी आवाज दिल्यावर दादा गाडीतून उतरून खाली आले.

​रऊफ शेख भावूक होऊन सांगतात, “मी त्यांना जुन्या प्रचाराचा प्रसंग सांगितला आणि दादा क्षणार्धात आठवणीत रमले. ‘अरे पठ्ठ्या, कुठे होतास?’ असं विचारत त्यांनी पुन्हा एकदा माझ्या खांद्यावर हात ठेवला. ३८ वर्षांनंतरही त्यांच्या स्पर्शातील तीच आपुलकी आणि तोच साधेपणा कायम होता. त्यांनी माझा नंबर नोंदवून घेतला आणि काहीही अडचण असल्यास हक्काने येण्यास सांगितले.”

एक ‘मुस्लिम मावळा’ पोरका झाला

२८ जानेवारी २०२६ चा तो काळा दिवस रऊफ शेख कधीच विसरू शकणार नाहीत. सोशल मीडियावरील निधनाची बातमी वाचून त्यांना धक्काच बसला. खात्री करण्यासाठी त्यांनी आपल्या बारामतीच्या मित्रांना फोन लावले, पण तिथूनही केवळ हुंदकेच ऐकू आले.

“राजकारणातला एक हिरा नियतीने हिरावून घेतला. दादा गेले नाहीत, ते आमच्या आठवणीत अमर राहतील. त्यांनी मला दिलेली ‘पठ्ठ्या’ ही हाक माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहील,” अशा शब्दांत रऊफ शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

​शिस्तप्रिय, रोखठोक पण काळजात माणुसकीचा ओलावा जपणाऱ्या एका जननेत्याला एका खाकी वर्दीतील ‘बारामतीकर’ मावळ्याने वाहिलेली ही श्रद्धांजली आज सर्वांचेच डोळे ओलावून जात आहे.

पोलिस उपनिरीक्षक रऊफ शेख यांची पोस्ट

कैलासवासी श्री अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ माझा अनुभव –
माझे इयत्ता सहावी ते एफ वाय बी कॉम पर्यंतचे शिक्षण बारामती येथे शाहू हायस्कूल व त्यानंतर टीसी कॉलेज येथे झालेले आहे त्या वेळचे बारामती येथील राहणारे श्री विनोद गालिंदे, श्रीकांत बुलबुले, सचिन गुजर, विजय गव्हाळे, अजय बिचकर, प्रशांत संघवी, दिलीप शिंदे, चंद्रकांत मखरे, राजेंद्र मखरे, विजय बनकर, राजू देवकाते, त्यांचे मोठे भाऊ नानजी देवकाते, दिलीप काळे, आबा चिंचकर, उदय शेंबेकर, कापडणीस सर, राजू टेलर, सुधीर राठोड, विनोद आचार्य व राजू शेंडगे असे बरेच माझे मित्र होते.

मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना म्हणजे सण 1985 मध्ये माननीय श्री शरद चंद्रजी पवार साहेब हे बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचे निवडणुकीला उभे होते. ते त्यापूर्वी पासूनच बारामतीचे आमदार होते. मी त्या वेळच्या बऱ्याच हिरो व व्हिलन कलाकार यांचे आवाजाची मिमिक्री करायचो.त्याकाळी मराठी सिनेमात निळू फुले हे कलाकार प्रसिद्ध व्हीलन होते. त्यांची बोलण्याची खास शैली होती. मी त्यांचे आवाजाची मिमिक्री करायचो.

सन 1985 मध्ये निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी चालू होती व रिक्षा, बैलगाडी, टेम्पो आणि ट्रक मध्ये बसून लाऊड स्पीकर वर प्रचार व्हायचे. प्रचारामध्ये गाणी वाजंत्रीवाले व कार्यकर्ते अति उत्साहाने सामील व्हायचे.त्यावेळी व्हीलनची भूमिका करणारे प्रसिद्ध कलावंत निळू फुले यांचे आवाजात मी माननीय श्री शरद पवार साहेब यांचा प्रचार करण्याचे ठरवले.

प्रचारामध्ये निळू फुले यांचे आवाजात – ऐका, ऐका, ऐका, हो बारामतीकर,धोतर वाले, पॅन्टवाले,  पायजमा वाले, टोपीवाले, फेटे वाले, चष्मे वाले, गॉगल वाले कॅप वाले सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आपल्या बारामती मतदार संघातून विधानसभा निवडणुकीकरिता तरुण तडफदार लाडके उमेदवार श्री शरदचंद्रजी पवार हे उभे आहेत. तरी सर्वांनी मतदानाच्या दिवशी त्यांचे नावासमोरील निशाणी वर रबरी फुली चा शिक्का मारून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या, अशी वाक्य म्हणण्याची प्रॅक्टिस केली.

मला आमदार साहेबांना कोण भेटवेल व मला प्रचाराची संधी कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करू लागलो व मी तसे माझ्या मित्रांना बोलून दाखविले. दुर्गा सिनेमा थिएटर शेजारी राहणारे माझे मित्र विनोद आचार्य यांना ते समजले. त्यांनी मला निळू फुले यांचे आवाजात प्रचार करण्यास सांगितला. मी त्यांना वरील पाठ केलेली वाक्य म्हणून दाखविली त्यांना ते खूप आवडले

मित्र विनोद आचार्य हे मला श्री शरद पवार साहेबांचे पुतणे श्री अजित दादा पवार साहेब यांचे कडे घेऊन गेले व त्यांना माझे प्रचाराबाबत सांगितले. श्री अजित दादा पवार हे त्यावेळी पंचवीसीतले असावेत. तरणाबांड गडी, डोक्याचे काळेभोर केस, पांढरे शुभ्र कपडे,पायात कोल्हापुरी चप्पल, डोळ्यास काळा गॉगल व हातात घड्याळ असे ते व्यक्तिमत्व आजही माझ्या डोळ्यासमोर उभे आहे. त्या वेळचा त्यांचा आवाज व आत्ताचा त्यांचा आवाज यात काहीच फरक नाही.

मी त्यांचे व्यक्तिमत्व व त्यांचे चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून थोडा घाबरलो त्यांनी ते लगेच ताडले व मला म्हणाले, अरे बाबा घाबरू नकोस, चल सुरू कर, असे म्हणाल्यावर मी थोडे क्षण डोळे बंद करून मनाची समजूत काढली व कलाकार निळू फुले यांच्या आवाजाच्या लकब मध्ये मी श्री शरद पवार साहेबांचे प्रचाराची वाक्य म्हणालो. ते ऐकल्यावर श्री अजित पवार साहेब व जमा असलेले सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या.

त्यावेळी श्री अजित पवार साहेब म्हणाले वारे पठ्ठ्या, चांगला आवाज काढतो की तू, आणि हा तुझा प्रचाराचा अंदाज जरा वेगळाच आहे,चल तुला प्रचारात घेतो, असे म्हणाले व त्यांनी एका ट्रकवरचे कार्यकर्त्याला बोलावून सांगितले की, अरे या पठ्ठ्याला तुमच्यासोबत केबिनवर बसवा, त्याच्या हातात माईक द्या आणि करू द्या त्याला साहेबांचा प्रचार, असे सांगितले.

मला म्हणाले अजिबात लाजू नको, तुझ्या कामावर फोकस कर, हातात माईक घेतला की तूच निळू फुले आहे असे समजून खास त्यांचे शैलीत प्रचार कर जा, असे म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. त्यांची ती पाठीवरची थाप व तो हाताचा स्पर्श आजही मला जाणवतो. माझे त्यांचे बोलण्याने व पाठीवरच्या थापेने  एकदम स्फूर्ती आली व मी प्रचार चालू केला.

“दोन दिवसात माझे आवाजाची प्रचाराची चर्चा कार्यकर्त्यांनी माननीय श्री शरद पवार साहेब यांना सांगितली. त्यांनी मला बोलावून घेतले. मी त्यांना भेटायला त्यांचे घरी गेलो असता तेथे प्रचंड गर्दी होती. गर्दीत श्री. अजित दादा ही हजर होते. ते माझ्या जवळ आले व माझे खांद्यावर हात ठेवून पवार साहेबांना म्हणाले, काका याच्या प्रचाराचा जरा वेगळाच पॅटर्न आहे, हा बारामतीचा निळू फुले आहे, असे कुतूहलाने म्हणून मला, चल रे पठ्ठ्या सुरू कर, असे म्हणावे श्री. अजित पवार साहेब यांनी मला हिम्मत दिल्याने पवार साहेबांसारख्या दिग्गज व्यक्तीमत्वासमोर मी कलाकार निळू फुले यांचे आवाजात प्रचार करून दाखवला. श्री.पवार साहेब हे गालातल्या गालात हसले व मला म्हणाले, तुला कोणी संधी दिली  तेव्हा मी श्री.अजित दादांकडे बोट केले. त्यांनी दादांकडे व माझ्याकडे पाहून,ठीक आहे,चालू ठेवा, असे म्हणाले.”

प्रचाराचे रणधुमाळीत श्री शरद पवार साहेब यांचे  भाषण ऐकण्यासाठी मी जायचो. त्यावेळी एका सभेसाठी मी लवकर गेलो व पाहतो तर काय ? श्री अजित दादा पवार साहेब व इतर कार्यकर्ते सभेच्या स्टेज समोर खुर्च्या मांडत होते, सतरंज्या आथरत होते.ते पाहून मी विचार केला की, श्री. शरद पवार साहेब यांचा पुतण्या कार्यकर्त्यांसोबत अगदी साधेपणाने काम करतोय,त्याला काही गर्व नाही. हे पाहिल्याने मी ही त्यांचे सोबत खुर्च्या मांडण्यासाठी मदत केली व सभा झाल्यावर आवरावरीला मदत केली. प्रचाराची रणधुमाळी संपली. श्री शरद पवार साहेब भरघोस मतांनी निवडून आले.

नंतर माझी श्री. अजित दादा पवार साहेब यांच्याशी भेट झाली नाही. मी पुढील शिक्षणासाठी श्रीरामपूर येथे निघून आलो. नंतर मी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात सन 1987 सालात रुजू झालो.

आमचे आवडते श्री अजित दादा पवार साहेबांना मी त्यानंतर दूरदर्शनवर नेहमी पहायचो, ऐकायचो,वर्तमानपत्रात त्यांच्या बातम्या वाचायचो.आमचे आवडते दादा नंतर माननीय आमदार झाले, मंत्री महोदय झाले व माननीय उपमुख्यमंत्री साहेब देखील झाले.

मी दूरदर्शनवर, वर्तमानपत्रात व हल्लीच्या सोशल मीडियावर त्यांच्याशी एकतर्फी संपर्कात होतो. त्यांची भाषणे ऐकून कायमच त्यांची स्तुती करायचो. त्यांची शीघ्र निर्णय शक्ती प्रचंड प्रभावी होती. दादांचा मला कायम एकतर्फी सहवास वाटायचा. त्यांचा प्रथम माझ्याशी झालेला संवाद व त्यांची माझ्या पाठीवरची थाप आजही मला जाणवते. त्यांचे खास शब्द वारे पठ्ठ्या, हे मी मरेपर्यंत विसरू शकत नाही.

मी पोलीस सेवेत उपनिरीक्षक पदावर असताना दोन वर्षांपूर्वी एकदा माझे आदर्श श्री. अजितदादा पवार साहेब हे अहिल्यानगरच्या विश्रामगृहात कामानिमित्त आल्याची माहिती मला मिळाली. दादांना भेटण्याची, पाहण्याची व त्यांच्याशी बोलण्याची माझ्या मनात खूप इच्छा होती. त्यांना समक्ष पाहून तब्बल 38 वर्ष कालावधी लोटलेला होता. मी त्यांना भेटण्याचा निश्चय करून विश्रामगृह येथे गेलो. तेथे प्रचंड गर्दी होती. दादा लोकांशी बोलत होते. लोकांच्या अडचणी ऐकून त्यावर जागीच निर्णय घेत होते व लोकांना तसे सांगत होते. तसेच नियमात असलेली सर्व कामे करण्याबाबत त्यांचे स्विय सहाय्यक यांना सूचना देत होते. दादांची ही काम करण्याची पद्धतच लोकांना खूप आवडत असे.

“मी गर्दीतून दादांकडे गेलो, दादा गाडीत बसत होते.  धाडस करून मी दादांना आवाज दिला, दादा, मी बारामतीला राहायचो, दोन मिनिटे तुम्हाला भेटायचं आहे, असे म्हणताच त्यांनी माझ्याकडे पाहिले व गाडीत बसता बसता उतरून ते बाहेर आले व मला म्हणाले, बोल बारामतीकर, इकडं कसा ? असे म्हणाले. मला त्यांना पाहून व त्यांचे बोलणे ऐकून खूप आनंद झाला व डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.त्यांनी ते लगेच ओळखले व स्मित हास्य करीत माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांचे हाताचा स्पर्श मला नवीन नव्हता. मी दादांना म्हणालो, दादा 38 वर्षानंतर तुमचा हात पुन्हा माझ्या खांद्यावर आला व असं वाटतच नाही की, इतकी वर्षे झाली.

दादा पुन्हा हसले व म्हणाले आरे बाबा, तुझा परिचय दे, काही अडचण आहे का ?, तुझा अर्ज कुठे आहे ?, काय काम आहे ? या प्रश्नाने मला खूप बरे वाटले की,दादांना सामान्य जनतेची किती काळजी आहे, त्यावर मी दादांना म्हणालो, दादा माझे काहीच काम नाही,फक्त तुम्हाला भेटायचं म्हणून आलो, असे सांगून माझा परिचय म्हणजे माझे नाव रऊफ शेख असल्याचे त्यांना सांगितले व म्हणालो की, दादा तुम्ही मला ओळखणार नाहीत. कारण मी 38 वर्षांपूर्वी तुमचे संपर्कात आलो होतो.पंधरा-वीस दिवसात तीन – चार वेळा आपली भेट झाली होती.

त्यावर ते म्हणाले, अरे मला आठवेल, तू विशेष प्रसंग सांग,असे म्हणाले असता, मी त्यांना सन 1985 सालाचे कलाकार निळू फुले यांचे आवाजातील माननीय श्री.शरद पवार साहेब यांचे आमदारकीचे निवडणुकीचे प्रचाराचा प्रसंग सांगितला. त्यांना ते सेकंदातच आठवलं, ते खळखळून हसले व म्हणाले,अरे हा, तू बारामतीचा निळू फुले, अरे पठ्ठ्या कुठे हरवला होता इतकी वर्ष ?, असे म्हणाले.

मी त्यांना पोलीस मध्ये असून सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयात पीएसआय पदावर नोकरीस असल्याचे सांगितले.ते ऐकून खुश झाले व मला म्हणाले, म्हणजे बारामतीच्या शिक्षणाचा तुला फायदा झाला की, अरे काहीही व कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मला डायरेक्ट येऊन भेट किंवा फोन कर, घाबरू नको,असे म्हणून त्यांचे स्वीय सहाय्यकाला माझा मोबाईल नंबर घेण्यास सांगितले व मला बारामतीला एकदा येऊन सहज भेट, असे सांगितले.

दादांच्या स्वभावात काहीच फरक पडलेला नव्हता. त्यांचा तोच साधेपणा, तोच आत्मविश्वास,तीच शीघ्र निर्णय शक्ती, कार्यकर्ते व जनतेत भेदभाव न करता सर्वांची कामे करणे या त्यांचे स्वभावाची मला पुन्हा एकदा प्रचिती आली. अगदी अडोतीस वर्षानंतरही दादा जसेच्या तसेच होते. दादा गाडीत बसले व पुढच्या कामासाठी निघून गेले.

काल दिनांक 28/01/ 2026 रोजी दादांचे विमान अपघातात निधन झाल्याची सोशल मीडियावर बातमी पाहून डोळ्यावर विश्वासच बसेना, डोकं सुन्न झालं,डोकं बंद पडल्यासारखं वाटलं. बातमी फेक असावी असे वाटले म्हणून खात्री करण्यासाठी चॅट जी पी टी ला विचारलं त्यातही दुःखदच बातमी वाचायला मिळाली म्हणून बारामतीच्या काही मित्रांना फोन लावले.त्यांनीही रडत रडतच दुःखद बातमी सांगितली.

दादांच्या जाण्याने खूप वाईट झाले. राजकारणातला एक हिरा नियतीनं आमच्यातून हिरावून घेतला. दादांच्या भेटण्याने माझे आनंदाश्रू निघाले होते परंतु त्यांचे जाण्याने दुःखाचे अश्रू थांबायला तयार नाहीत.दादा आम्हाला सोडून जाऊच शकत नाहीत. ते गेले नाही ते अमर आहेत व राहतील. आमच्यात अप्रत्यक्षपणे दादांचा सहवास राहील.आम्ही जिवंत असे पर्यंत ते आमच्या सोबत आहेत अशीच आम्हाला जाणीव होत राहील.

दादांनी मला पठ्ठ्या म्हणालेले व माझे पाठीवरील हाताचा स्पर्श मी मरेपर्यंत विसरणार नाही.दादा आमच्यात अदृश्यपणे राहतील हे त्रिकाल बाधित सत्य आहे.

आमचे आवडते कैलासवासी श्री. अजित दादा पवार साहेब यांना स्वर्गवास लाभो व त्यांचा आमच्यात अप्रत्यक्ष सहवास राहो ही माझी अल्लाह चरणी प्रार्थना आहे.

वरील अनुभव मांडण्यात काही चूक झाल्यास माफी असावी.

माझ्या लाडक्या दादांचे माझे अनुभव –
रऊफ शेख ( निवृत्त पोलिस अधिकारी)
आजीवन दादांचा कार्यकर्ता व एक मुस्लिम मावळा.