कर्जतच्या राजकारणात नवा ट्विस्ट; सहा नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या साडेचार वर्षांत सातत्याने राजकीय उलथापालथ अनुभवणाऱ्या कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात आता आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी पक्षाचा व्हीप डावलून गैरहजर राहिलेल्या सहा नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबत आदेश दिल्याने कर्जतच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

१५ जुलै रोजी उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्यावरील अविश्वास ठरावावर मतदान झाले होते. या मतदानावेळी सहा नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर गटनेते सतीश पाटील यांनी संबंधित नगरसेवकांनी व्हीपचे उल्लंघन केल्याचा दावा करत जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या अपात्रतेसाठी प्रस्ताव दाखल केला होता.
साडेचार वर्षांत समीकरणांची अनेकदा उलथापालथ
कर्जत नगरपंचायतीतील पदाधिकारी बदलाच्या राजकारणात गेल्या साडेचार वर्षांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.
तत्कालीन नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या कारभारावर नाराज होत आमदार रोहित पवार यांच्या गटातील १५ पैकी ११ नगरसेवकांनी बंडखोरी केली. या नगरसेवकांनी राऊत यांच्याविरोधात अविश्वास दाखवत त्यांना नगराध्यक्षपदावरून पायउतार केले.
यानंतर या ११ बंडखोर नगरसेवकांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबत राजकीय समीकरण जुळवले. भाजपच्या दोन नगरसेवकांनाही सोबत घेत रोहिणी घुले यांना कर्जतच्या नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली.
त्यावेळी उर्वरित कार्यकाळात दोन नगराध्यक्षांना संधी देण्याचे ठरल्याचे सांगितले जात होते. मात्र ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतरही रोहिणी घुले यांनी राजीनामा न दिल्याने या गटात पुन्हा मतभेद निर्माण झाले आणि कर्जतच्या राजकारणात आणखी एक बंड घडले.
रोहिणी घुलेंविरोधात पुन्हा बंड; अडीच महिने न्यायालयीन लढाई
रोहिणी घुले यांना नगराध्यक्षपदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या गटातील चार नगरसेवकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. घुले यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.
या प्रक्रियेत तब्बल अडीच महिने न्यायालयीन लढाई झाली. अखेर रोहिणी घुले यांना नगराध्यक्षपदावरून दूर करण्यात आले आणि पूर्वी ठरल्याप्रमाणे छाया शेलार यांना कर्जतच्या नगराध्यक्षपदाची संधी मिळाली.
उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचालीत पुन्हा फुटला गट
नगराध्यक्ष बदलानंतर उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला. मात्र याच टप्प्यावर रोहिणी घुले यांना बाजूला करण्यासाठी एकत्र आलेल्या भाजपसमर्थक गटात पुन्हा बंडाळी झाली.
भाजपच्या ताराबाई कुलथे आणि मोनाली तोटे यांनी रोहिणी घुले–संतोष मेहेत्रे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. १५ जुलै रोजी उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी गटनेत्याने बजावलेला व्हीप डावलून सहा नगरसेवक गैरहजर राहिले.
यामध्ये माजी नगराध्यक्षा रोहिणी घुले, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, संतोष मेहेत्रे तसेच भाजपच्या ताराबाई कुलथे आणि मोनाली तोटे यांचा समावेश होता.
१७ जुलैला प्रस्ताव; तीन वेळा झाली सुनावणी
या सहा नगरसेवकांविरोधात गटनेते सतीश पाटील यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८७ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.
१७ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडे व्हीप उल्लंघनप्रकरणी सहा नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भातील प्रस्ताव दाखल करण्यात आला.
या प्रकरणावर २२ जुलै, ३० जुलै आणि ५ ऑगस्ट अशा तीन सुनावण्या झाल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १८ ऑगस्ट रोजी निर्णय दिला.
सहा जणांवर अपात्रतेची कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांनी गटनेते सतीश पाटील यांचा सदस्य अनर्हतेचा प्रस्ताव मान्य करत रोहिणी घुले, मोनाली तोटे, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, संतोष मेहेत्रे आणि ताराबाई कुलथे यांच्याविरोधात अपात्रतेचा आदेश पारित केला.
या आदेशामुळे आधीच वारंवार बदलणाऱ्या कर्जत नगरपंचायतीतील राजकीय समीकरणांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, पुढील राजकीय घडामोडींकडे आता कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.