Nagpur : सहाय्यक पोलीस निरीक्षकाने संपवले जीवन; पोलिस दलात खळबळ,पुढील तपास सुरू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नागपूर पोलिस आयुक्तालयातील अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर झोल (वय ३५) यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस क्वार्टरमध्ये शनिवारी (ता.१५) मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आत्महत्या केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Nagpur, Assistant Police Inspector dnyaneshwar zol ends his life, incident sends shockwaves through police force, further investigation underway,

झोल हे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या ‘अर्ज’ आणि ‘प्रोटोकॉल’ विभागात कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

मिळालेल्या माहितीनुसार रात्री कर्तव्यावरून परतल्यावर त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण केले. रात्री त्यांनी दोन मुले झोपलेली नसल्याने पत्नी त्यांना झोपविण्यासाठी बेडरुममध्ये गेल्या होत्या. त्यानंतर परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आली. घटनेची माहिती परिसरात मिळताच, इतर सहकार्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळ गाठले आणि पंचनाम्यासह आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. अधिकाऱ्याच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले जात आहेत. तसेच, घटनेपूर्वी संबंधित अधिकारी कोणत्या परिस्थितीत होते आणि ते कोणाच्या संपर्कात होते, याचाही पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट (आत्महत्या चिठ्ठी) किंवा अन्य महत्त्वाचा पुरावा सापडला नाही.

आत्महत्येच्या कारणांचा शोध सुरू

पोलिस अधिकाऱ्यासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने पोलिस दलात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोणत्या परिस्थितीमुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले? ते वैयक्तिक, कौटुंबिक किंवा इतर समस्यांशी झुंज देत होते का? सध्या तरी या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळालेली नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आत्महत्येचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

कामाचा ताण, वैयक्तिक समस्या की मानसिक तणाव ?

सहाय्यक पोलीस निरीक्षक झोल यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे सहकारी आणि कर्मचारी हादरून गेले आहेत. पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे पोलिस दलातील कामाचा ताण, वैयक्तिक समस्या आणि अधिकाऱ्यांना भेडसावणारा मानसिक तणाव यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.