जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सकाळी झोपेतून उठून नेहमीप्रमाणे दैनंदिन कामाला सुरुवात केलेल्या दोन भावांना काही क्षणांतच मृत्यूने गाठले. गोठ्याबाहेर कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या लोखंडी तारेत अचानक हाय व्होल्टेज वीजप्रवाह उतरल्याने दोघांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या एका महिलेलाही विजेचा धक्का बसल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

दौंडच्या राहुमध्ये नेमकं काय घडलं?
रोहित अनिल भोईटे आणि ओम नितीन भोईटे अशी मृत्यू झालेल्या दोन भावांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहू येथील सोनवणे मळा परिसरात बुधवारी सकाळी ही घटना घडली.
सकाळी दोघेही घराबाहेर येऊन दैनंदिन काम करत होते. गोठ्याबाहेर कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या लोखंडी तारेवर कपडे टाकत असताना अचानक त्या तारेत हाय व्होल्टेज वीजप्रवाह उतरला. तारेचा स्पर्श होताच दोघांनाही विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते जागीच कोसळले.
दोघांना वाचवण्यासाठी एक महिला धावली. मात्र, तिलाही विजेचा धक्का बसल्याने ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा खंडित केला. मात्र, तोपर्यंत रोहित आणि ओम यांचा मृत्यू झाला होता.
जखमी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
आदल्या रात्रीपर्यंत सर्वकाही सुरळीत असताना सकाळी अचानक घडलेल्या या घटनेने भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन तरुणांचा एकाच वेळी झालेला मृत्यू मन हेलावून टाकणारा ठरला असून राहू परिसरासह दौंड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाची यवत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.