जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मोठे यश आले आहे. (Motorcycle thieves arrested in Pune and Ahmednagar districts) जुन्नर तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. दोन मोटारसायकल चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून ०८ गुन्हे उघडकीस आले आहेत.पोलिसांनी चार लाख दहा रूपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या ११ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही धडाकेबाज कारवाई पार पाडली आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरांनी मोठा धुमाकूळ घातला होता.मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे मोटारसायकल चोरांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे अव्हान पुणे ग्रामीण व अहमदनगर पोलिसांसमोर उभे ठाकले होते.त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला होता.त्यानुसार सदर गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली.
१३ जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला जुन्नर तालुक्यातील खोडद या गावात काही इसम काही एक कामधंदा न करता वारंवार विविध प्रकारच्या मोटारसायकल वापरत आहेत अशी बातमी खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खोडद गावात छापा टाकला असता पोलिसांची चाहुल लागताच आरोपी पळून जाऊ लागले होते. पोलिसांनी सिद्धार्थ रमेश बर्डे वय २१ रा. खोडद ता. जुन्नर जि. पुणे आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक या दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांची अजून सखोल चौकशी केली असता त्यांनी आठ गुन्ह्यांची कबुली देत त्यांच्या ताब्यातील विविध कंपनीच्या ११ मोटारसायकल ह्या चोरी करून आणल्या असल्याचे सांगितले.
चौकशी दरम्यान त्याने पुणे आणि नगर भागात चोरी केलेल्या इतर मोटारसायकलींची माहिती दिली. त्यांचे गुन्हे खालील पोलीस स्टेशनला दाखल आहेत
१) नारायणगाव पो.स्टे गु र नं
१२१/२०२१ भा द वी ३७९
२) नारायणगाव पो. स्टे गु र नं
१२०/२०२१ भा द वी ३७९
३) रांजणगाव पो.स्टे गु र नं
४७/२०२१ भा द वी ३७९
४) आळेफाटा पो.स्टे गु र नं
७२/२०२१ भा द वि ३७९
५) पारनेर पो.स्टे गु र नं
६१/२०२१ भा द वी ३७९
६) पारनेर पो. स्टे गु र नं
८८४/२०२० भा द वी ३७९
७) पारनेर पो.स्टे गु र नं
३०५/२०२१ भा द वी ३७९
८) श्रीरामपूर शहर पो.स्टे गु र नं
२१३१/२०२० भादवि ३७९