एसटीच्या कर्मचारी आंदोलन : आर्थिक लुटीचा गोरखधंदा तेजीत, प्रवाशी बेहाल

लालपरीचे चाके थांबली; प्रवाश्यांचे हाल सुरू

कडा (आष्टी) । राजेंद्र जैन। एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचा-यांनी चक्काजाम आंदोलन पुकारल्यामुळे ऐन सणासुदीच्या कालावधीत प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अंदोलनाचा फायदा उचलत खाजगी बस व इतर वाहनचालकांनी प्रवास भाड्यात अक्षरश: दामदुपटीने वाढ करत प्रवाश्यांची आर्थिक लुटमार सुरू केली आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून एसटीच्या चालक-वाहक कर्मचा-यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसह इतर विविध प्रश्नांसाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरु केल्याने रस्त्यावर धावणा-या लालपरीची चाकं थांबली आहेत. त्यामुळे वेळेवर पोहचण्यासाठी प्रवाशांना बसस्थानक परिसरात तासंतास ताटकळत  वाहनांच्या प्रतिक्षेत थांबण्याची वेळ आली आहे.

ऐन सण-उत्सवाच्या कालावधीतच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे. एकीकडे एसटी बंदअभावी प्रवाशांची गैरसोय झाली असतानाच, दुसरीकडे मात्र खाजगी बस व वाह‌नधारकांनी लुटीचा धंदाच थाटला आहे. एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाच्या संधीचा फायदा उचलून प्रवास भाड्यात चक्क दामदुपटीने वाढ करुन प्रवाशांची अक्षरश: आर्थिक लूट केली आहे. अगोदरच मोदी सरकारच्या महागाई स्पर्धेमुळे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत भरमसाट वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक महागाईने हवालदिल झाला असतानाच्या आता खाजगी वाहनचालकांची भाडेवाढ प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

सरकारने प्रवाशांची गैरसोय दूर करावी – सरसमकर

एसटी कर्मचा-यांच्या चक्काजाम आंदोलनामुळे ऐन सणासुदीत बस बंद झाल्याने ठिकठिकाणी प्रवाशांची गैरसोय झाली असून खाजगी बस व इतर वाहनधारकांनी दामदुपटीने भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सरकारने एसटी कर्मचा-यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावून सर्वसामान्यांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी अभय सरसमकर या प्रवाश्याने केली आहे.