Sautada waterfall | सौताडा धबधब्यावरून उडी मारून ग्रामसेवकाची आत्महत्या

पाटोदा  : बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका 50 वर्षीय इसमाने दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सौताडा धबधब्याच्या दरीत सातत्याने आत्महत्येच्या घटना घडत आहेत. आसपासच्या तालुक्यातील नैराश्यग्रस्त या ठिकाणी येऊन आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे सातत्याने घडत आहे.  सततच्या या घटनांना आळा घालण्याची आवश्‍यकता आहे.

दरम्यान सौताडा दरीत एका इसमाने आत्महत्या केल्याची बातमी समजताच पाटोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता धबधब्याजवळ एक बॅग सापडली यामध्ये एक ओळखपत्र सापडले आहे. सदर इसमाचे नाव झुंबर मारुती गवांदे ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालय श्रीगोंदा असे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला असता सदर मृतदेह उंचावरून दगडात पडल्याचे निदर्शनास आले. रात्र झाल्याने मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी उद्या सकाळची वाट पाहावी लागणार आहे. मृतदेह अडचणीच्या ठिकाणी पडलेला आहे. तो बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.सौताड्यातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वनविभागाने संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे.अशी मागणी गांवकरी करत आहेत.

धबधब्याभोवती संरक्षक भिंत उभारा – सानप

धबधब्याभोवती संरक्षक भिंतीची गरज आहे. वन विभागाने या ठिकाणी एखादा कर्मचारी नियुक्त करावा, अन्यथा असे प्रकार होत राहतील असे पाटोद्याचे माजी सभापती गोवर्धन सानप म्हणाले.

सौताड्याचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात – शिंदे

सौताडा रामेश्वर हे बीड जिल्ह्याचे भूषण आहे. धबधब्यावरून अनेक वेळा आत्महत्येचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे येथील पावित्र्य भंग पावते. वनविभाग आणि प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी किरण शिंदे पाटील यांनी केली.