- Advertisement -

रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग… पळापळ… धावाधाव.. सुदैवाने अहमदनगरची पुनरावृत्ती टळली   

लातुर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीची घटना ताजी असतानाच लातूरमधील रुग्णालयात आगीची घटना घडली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Vilasrao Deshmukh Government Medical College) नवजात बालक अतिदक्षता विभागात आग लागली आणि एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही. (fire broke out in the child intensive care unit of Vilasrao Deshmukh Government Medical College)

नवजात बालक अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत ही आग विझवली आहे.

रुग्णालयात देवीच्या फोटोपुढे दिवा लावल्यामुळे काच तडकून खाली पडली आणि पेपरला आग लागली. अतिदक्षता विभागात ही आग पसरली आणि त्यानंतर शॉर्टसर्किटमुळे आग आणखीनच वाढल्याचे सांगण्यात येत आहे. या अतिदक्षता विभागात ३७ बालके उपचार घेत आहेत. त्यापैकी एक बालक व्हेंटिलेटरवर आहे. या सर्व बालकांना कर्मचार्‍यांनी सतर्कता दाखवत इतरत्र हलवल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ४ जणांचा होरपळून तर ६ जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. लातूरच्या रुग्णालयात आग लागली तेव्हा अतिदक्षता विभागात २७ बालके उपचार घेत होती. मात्र, त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

नेमके काय घडले?

लातूरचे विलासराव देशमुख आरोग्य विज्ञान संस्थेचे रुग्णालय. सायंकाळचे चार वाजले होते. रुग्णालयात दररोजचे रुटीन सुरु होते. डॉक्टर रुग्णांना तपासत होते. नर्स संध्याकाळचे औषध रुग्णांना देत होत्या. डॉक्टरांनी रुग्णांना तपासल्यानंतर रिपोर्ट कार्डवर नोंद करीत होत्या. चहाची वेळ असल्याने रुग्णालयातील रुग्णांना चहा वाटप सुरु होते. आया, वॉर्डबॉय कुणी चहाचे घोट घेत होते तर कुणी रुग्णांची सुश्रुषा करीत होते. सर्व रुटीन आलबेल सुरु असतानाच अचानक रुग्णालयातील फायर अलार्म वाजला आणि रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, नर्स, कर्मचारी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. फायर अलार्मच्या दिशेने धाव घेतली असता समोरील धूर पाहिला आणि डॉक्टर, नर्ससह सर्वांचीच एकच तारांबळ उडाली. तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलानेही कार्यतत्परतेने धूर आटोक्यात आणला आणि धूराच्या दिशेने आत जाऊन पाहिले अन् सर्वांनीच हुश्श केले. केवळ कागद जळाल्याने धूर निघत असल्याचे स्पष्ट झाले.

आग कशी आणि कुठे लागली?

रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षासमोरच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे स्टाफ रुम आहे. या स्टाफ रुममध्ये देवीचा फोटो आहे, जिथे नियमित दिवा लावला जातो. सायंकाळी 4 च्या सुमारास स्टाफपैकी कुणीतरी देवीच्या फोटोसमोर लावला. दिवा लावल्यानंतर ती व्यक्ती रुम बंद करुन आपल्या कामाला निघून गेली. त्यानंतर हा दिवा कलंडला आणि जवळच ठेवलेल्या कागदांवर पडला. पेटता दिवा पडल्याने कागदांनी पेट घेतला आणि धूर रुमबाहेर पडू लागला. धूर सर्वत्र पसरू लागल्यानंतर कक्षात बसवलेला फायर अलार्म वाजला. फायर अलार्म वाजल्यानंतर स्टाफ रुमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर धूर आणखीनच पसरु लागला. धूर पाहून डॉक्टर, नर्स, रुग्ण, नातेवाईक सर्वांचीच जीवाच्या भीतीने भंबेरी उडाली. स्टाफ रुमच्या समोरच 4 फुटांवर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षात 37 बालके उपचार घेत आहेत. या सर्व बालकांना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि रुग्णालय कक्ष प्रमुख डॉ. डोपे, डॉ.हळणीकर यांनी प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवले. त्यापैकी एक शिशु व्हेंटिलेटरवर होते. मात्र त्यालाही सुरक्षित हलविण्यात आले.

कोणतेही मालमत्ता नुकसान किंवा जीवितहानी नाही

नवजात शिशु अतिदक्षता विभागातील सर्व बालके तसेच रुग्णालयातील इतर रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णालयातीस सर्व कर्मचारी सुखरुप आहेत. तसेच रुग्णालयातील मालमत्तेचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. या घटनेनंतर लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली व समाज माध्यमांमध्ये सुरू असलेल्या अफवेला पूर्णविराम देण्याची विनंती केली. (Rumors of fire at Latur Vilasrao Deshmukh Government Hospital)