- Advertisement -

विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या दौर्‍यात पोलिसांना झाली पत्रकारांची ॲलर्जी? 

राजेंद्र जैन । कडा : विशेष पोलीस महानिरिक्षकांकडून आष्टी पोलीस ठाण्याची वार्षिक कामकाज मूल्यमापन तपासणी शुक्रवारी असल्यामुळे पोलिसांची भलतीच लगीनघाई दिसून आली. वरिष्ठांच्या नजरेस काही गोष्टी पडू नयेत याची दक्षता घेण्यात आली. मात्र या वार्षिक तपासणी वेळी विशेष महानिरीक्षकांनी जनता सुसंवाद या महत्वाच्या बाबीला फाटा दिला.या बाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवले तर नाहीच, पण पत्रकारांना देखील वरिष्ठांशी संवाद साधण्यापासून दूर  ठेवण्यात आले. त्यामुळे इथल्या पोलिस अधिका-यांना पत्रकारांची ॲलर्जी झाली की काय, असा थेट प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून आष्टी पोलिस ठाण्याची वार्षिक कामकाजाची मूल्यमापन तपासणी होणार असल्यामुळे आठ दिवसांपासून नुसती लगीनघाई चालू होती. साहेबांच्या आदेशानुसार आष्टी तालुक्यात ठिकठिकाणी गल्लीबोळात बोकाळलेले मलाईदार अवैद्य धंदे तात्पुरते बंद करण्यात आले होते. पोलीस ठाण्याचा परिसरात सर्व साफसफाई, टापटीप आणि कधी नव्हे ती स्वच्छता, सुव्यवस्थितपणा दिसत होता.एखाद्या विवाह सोहळ्यासारखा आकर्षक मंडप सजविण्यात आला होता. त्यासोबत स्वादिष्ट भोजनाची ही जय्यत तयारी केली होती. पोलीस कर्मचा-यांसह काही विशेष खाजगी मित्रांची ही लगबग दिसत होती.

मात्र यावेळी पत्रकारांना विशेष पोलीस महानिरीक्षकांना भेटून काही लोकहिताच्या सामाजिक प्रश्नांवर त्यांच्याशी संवाद साधण्याची उत्सुकता होती. याकरिता स्थानिक पोलीस अधिका-यांसह कर्मचा-यांशी त्यांच्या भेटी संदर्भात पत्रकारांनी संवाद साधला. परंतु वरिष्ठांच्या गोटातून पत्रकारांशी आणि जनतेशी सुसंवादासाठी वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार असोत की सर्वसामान्य जनता कुणालाही भेटता येणार नाही. असा संदेश स्थानिक पोलिस प्रशासनाकडुन आल्यामुळे पोलिस अन् जनता सुसंवाद नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.

आष्टीत नव्यानेच रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी, जुनेच पोलीस निरीक्षक यांचेकडूनही अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता अन् पत्रकारांशी देखील कसलाच संवाद नसल्यामुळे आता सर्वत्र नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

पोलिसांना पत्रकारांची ॲलर्जी ?

पोलिस अन् नागरिक यांचा  सुसंवाद असावा, सर्वसामान्य जनतेशी संवाद साधणे, पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे हे पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य असते, पण आष्टीतील पोलिस अधिकारी सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात नसतात आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही लोकांशी संवाद साधू देत नाहीत. त्यामुळे पोलिसांना पत्रकारांची अॅलर्जी झाली आहे की काय, अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांसह उपस्थित नागरीकांनी बोलून दाखवली.