सोमय्या पिता पुत्रांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल, INS विक्रांत प्रकरणी शिवसेनेकडून राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस
मुंबई, दि 7 एप्रिल : आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सोमय्या पिता पुत्र यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप विरूध्द महाविकास आघाडी संघर्षातील नवा अंक सुरू झाला आहे. (Kirit Somaiya and Son fraud case filed in INS Vikrant case)
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या पैशात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर माजी सैनिक बबन भोसले यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात काल मध्यरात्री गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आयपीसीच्या कलम ४२०, ४०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईत राऊतांचे अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील १ फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. यानंतर राऊतांनी काल (६ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या पैशात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
राऊत म्हणाले, “भाजपने आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी प्रचार केला आणि लोकांकडून पैसे उकळले. हे पैसे राज्यपालांकडे सुपूर्त करू असे सोमय्यांनी सांगितले. परंतु, जमा केलेले पैसे राज्यपालांपर्यंत पोहोचले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
राऊत पुढे असे देखील म्हणाले, आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवलेल्या माहिती अधिकारात हे उघडकीस आले. हा देशद्रोह आहे, त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेने यांचा तपास करावा. सोमय्या हे सीए असल्यामुळे त्यांना माहिती आहे की, पैसा कसा पचवायचा असे ते म्हणाले.
दरम्यान आज पुन्हा संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की, Mark my words, INS विक्रांतच्या नावे 56 कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेट्याना जेलमध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या bjp ला जाब विचाराच लागेल असे म्हटले आहे.
दरम्यान याच प्रकरणावरून शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेकडून लोकसभा व राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे. नियम 267 अंतर्गत चर्चेची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. (Notice of adjournment motion in Rajya Sabha by Shiv Sena in INS Vikrant case)