Ketan Vishal Agrawal Murder Case Pune : जिच्या सोबत सात फेरे घ्यायचे तिनेच संपवले : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात नवा खुलासा, पोलिसांनी केला खुन प्रकरणाचा भांडाफोड
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून केतन अग्रवाल या व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरूणाच्या मृत्यूप्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. जिच्या सोबत सात फेरे घ्यायचे होते तिनेच मित्राच्या मदतीने केतनचा गेम वाजवल्याचे समोर आले. या घटनेने व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत केतन अग्रवाल हा प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचं लग्न मार्केटयार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं. या दोन्ही मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता. जयपूर येथे या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नासाठी चक्क दोन विमानं देखील बूक करण्यात आली होती. मात्र, या भव्य लग्नाआधीच हा धक्कादायक अंत झाला.
लग्न पसंत नसल्याने मित्राच्या मदतीने रचला खुनाचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिने केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. ठरलेल्या कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथे योग्य संधी साधून सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. यात केतनचा जागीच मृत्यू झाला.
सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचा संशय होता, मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला असता सिया आणि तिच्या मित्रांनी कट रचून हा प्रकार घडवून आणल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या हाय-प्रोफाइल मर्डर मिस्ट्रीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
वाढदिवसानिमित्त दोघं लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले अन्…
केतन अग्रवाल हा मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील तरुण होता. जयपूरमध्ये त्याचं लग्न होणार होतं. लग्नासाठी दोन विमानं बुक करण्यात आली होती आणि मोठ्या थाटामाटात विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती. लग्नाआधी होणाऱ्या पत्नी सियाच्या वाढदिवसानिमित्त दोघं लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. मात्र लोहगडावरील हा ट्रेक केतनच्या आयुष्याचा शेवट ठरला. केतन 400 फूट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण यामागे मोठा प्लॅन रचला गेला होता.
उन्हाळ्याच्या दिवसात हुडी अन् चेहरा लपवला
पोलिसांनी तपास सुरू केला असता काही बाबी संशयास्पद वाटल्या. केतन नेमका कसा पडला? त्यावेळी परिसरात आणखी कोण होतं? याचा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांच्या माहितीनुसार, एका संशयित तरुणाच्या हालचाली सीसीटीव्हीत आढळून आल्या. उन्हाळ्याच्या दिवसात हुडी घालून, कानात हेडफोन लावून आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत हा तरुण परिसरात फिरताना दिसल्याचं तपासात समोर आलं. तरुणाच्या हालचाली पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला अन् धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.