जामखेड: भल्या पहाटे आयशर टेम्पो व कारचा पाटोद्याजवळ भीषण अपघात; २ शासकीय कर्मचाऱ्यांवर काळाचा घाला

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील पाटोदा येथून अपघाताची एक भीषण दुर्घटना समोर आली आहे. आयशर टेम्पो आणि कारच्या भीषण अपघातात दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Jamkhed Accident News)

Horrific collision between an Eicher tempo and car near Patoda in the early hours, two government employees lose their lives, jamkhed accident news,

राष्ट्रीय महामार्ग ५४८डी वर पुन्हा एकदा भीषण अपघाताची एक मोठी घटना घडली. या मार्गाला जागोजागी तडे गेल्याने सातत्याने अपघाताच्या मोठ्या घडना घडत आहेत. पाटोदा (गरड) गावाजवळील एका काॅर्नरवर मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने त्याठिकाणी दुरूस्तीचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहनधारकांना वळणाचा अंदाज येत नाही.

रविवारी पहाटे तीनच्या सुमारास याच भागात आयशर टेम्पो एमएच १४ बीजे २२८३ ) आणि कार (एमएच २० जीई ३५६) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशा: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात श्रीगोंदा तहसील कार्यालयातीलमहसूल सहाय्यक विकील बहुरे व कुकडी पाटबंधारे उपविभाग करमाळा मोजणीदार रामचंद्र बहुरे या दोघांचा मृत्यू झाला. दोन शासकीय कर्मचाऱ्यांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूमार्ग

जामखेड ते श्रीगोंदा हा ५४८ डी महामार्ग दळणवळण गतिमान व्हावे, जनतेला प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाला तिलांजली देत असल्याचे दिसत आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी अपुर्ण कामे आहेत. तर अनेक ठिकाणी या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. यामुळे अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. यात आजवर अनेकांचे बळी गेले आहेत. हा महामार्ग मृत्यूमार्ग बनू लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. सदर महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करून महामार्गाच्या कामातील अडथळे दुर करावेत अशी जनतेची मागणी आहे.

बातमी अपडेट होत आहे…