जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दोन लेकरांसह आयुष्य संपवणाऱ्या शिक्षक सुनील मोरे प्रकरणात (Sunil More case Nanded) एक अत्यंत खळबळजनक अपडेट समोर आली आहे. मोरे यांनी गाडी नदीत घालण्यापूर्वी आपल्या दोन्ही मुलांची धारदार शस्त्राने हत्या केल्याच उघड झालं आहे. हा धक्कादायक खुलासा पोस्टमार्टेम अहवालातून समोर आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या 42 वर्षीय सुनील मोरे या शिक्षकाने शुक्रवारी 16 जुलै रोजी सकाळी आपल्या दोन मुलांसह गाडी नदीत घातली होती. नांदेड-मूदखेड मार्गावरील आमदूरा पुलावरून भरधाव वेगाने त्याने गोदावरी नदीत गाडी घातली होती. मोरे यांच्या कारमध्ये त्याची 14 वर्षीय मुलगी सारा आणि 10 वर्षीय मुलगा सुमेध हे दोघे पण होते.
गुरूवारी संध्याकाळी सुनील मोरे आपल्या मुलांना क्लासमध्ये सोडतो म्हणून घरातून घेऊन निघाले. पण त्यांनी मुलांना क्लासमध्ये सोडलंच नाही. त्याऐवजी ते मुलांना घेऊन एका अज्ञातस्थळी गेले. सुनील मोरे यावेळी अस्वस्थ होते. क्लासचा वेळ संपला मुलं अजून घरी आली नाही म्हणून इतकं मोरे यांच्या पत्नी चिंतेत होत्या. त्यंनी सुनील मोरे यांना फोन करून पोरं कशी घरी आली नाहीत? अशी विचारणा केली. त्यावेळी मुलं माझ्यासोबत नाहीत, असं म्हणत मोरे यांनी पत्नीला उत्तर दिलं.
व्हॉट्स अॅपवर स्टेटस ठेवलं अन् अखेरचा निरोप
सुनील मोरे घरी परत न आल्याने पत्नीचा संशय वाढला. घटनेपूर्वी सुनील मोरे यांच्या व्हॉट्स ॲपवर स्टेटस ठेवलं अन् अखेरचा निरोप घेतला. मी माझ्या मुलांना संपवून आत्महत्या करतोय, असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलं. त्यावेळी त्यांनी हदगावचे गटशिक्षण अधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्चे, केंद्र प्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी दत्ता विश्वभर पवळे यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना मृत्यूस जबाबदार धरलं.
धारदार शस्त्राने हत्या मुलांची हत्या…
व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवल्यानंतर सुनील मोरे यांनी रात्री मुलं झोपेत असताना त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली, अशी माहिती पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आली आहे. त्यानंतर शिक्षक मोरे यांचा शोध सुरू होता. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनेगाव येथे सुनील मोरे यांनी गाडी आणली अन् अखेरचा प्रवास सुरू केला. मोरे यांनी मयत मुलांसह भरधाव कार थेट 50 फूट खोल गोदावरी नदीपात्रात टाकली. स्वता:ला संपवून घेतलं.
गट शिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी शिक्षक दत्ता पवळे यांच्या त्रासाला कंटाळून मुलांसह आत्महत्या करत असल्याच स्टेटस त्याने व्हाट्सअपवर ठेवलं होतं. शिवाय तसा एक मेसेज देखील मयत सुनील मोरे याने मित्रांच्या ग्रुपवर टाकला होता. सुनील मोरे याच्या मृत्यू प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांवर ॲट्रॉसिटी आणि मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला होता.
दोन्ही मुलांची आधीच केली होती हत्या
दरम्यान, आपल्या दोन्ही मुलांसह त्याने गाडी नदीत घातली असं प्रथमदर्शनी वाटत होतं. मात्र, या निर्दयी पित्याने गाडी नदीत घालण्यापूर्वीच आपल्या दोन्ही मुलांची हत्या केली असल्याचं आता शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे. चाकूने मुलगी सारा आणि मुलगा सुमेध यांच्या छातीवर आणि पोटात वार करून त्यांची आधी हत्या केली होती.
त्यानंतर दोन्ही मुलांच्या मृतदेहासह कार नदीत घालून आपलंही जीवन संपवलं. तिघांचे मृतदेह काढून शुकवारी शवविच्छेदन करण्यात आले. आज पोलिसाना शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दोन्ही मुलांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झालं. तेव्हा पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन मयत सुनील मोरे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.