जामखेडमध्ये खळबळ ! स्टील दुकानावर पोलिसांचा छापा; २० लाखांच्या तांब्याच्या तारा जप्त, दुकानदारावर गुन्हा दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेडमधील (Jamkhed) एका स्टील आणि भांड्याच्या दुकानावर पोलिसांनी (Police) केलेल्या छापेमारीत तब्बल २० लाख रूपयांच्या तांब्याच्या तारांचा साठा हस्तगत केला आहे. या प्रकरणात महेश मोहनलाल भंडारी (Mahesh Mohanlal Bhandari) या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (Jamkhed News Today)

Sensation in Jamkhed, Police raid steel shop copper wires worth ₹20 lakh seized, case registered against shopkeeper mahesh bhandari, jamkhed news today,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील तपनेश्वर रोड भागात महेश मोहनलाल भंडारी (वय ४८) यांचे ‘साई समर्थ स्टील व भांडे दुकान’ आहे. या दुकानामध्ये शेतीपंपासाठी उपयोगात येणाऱ्या तांब्याच्या सोललेल्या तारांचा मोठा साठा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती जामखेड पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे व त्यांच्या पथकाने भंडारी यांच्या दुकानावर छापा टाकला. या छाप्यात दुकानात ठेवलेल्या ३९ गोण्यांमध्ये एकूण १,६३५ किलोग्रॅम वजनाच्या सोललेल्या तांब्याच्या लहान-मोठ्या तारा आढळून आल्या. या तारांची अंदाजे किंमत १९ लाख ७९ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

छाप्यानंतर पोलिसांनी महेश भंडारी यांच्याकडे सदर तांब्याच्या तारांबाबत मालकीचे किंवा खरेदीचे कागदपत्र मागितले. मात्र, त्यांनी कोणतीही वैध कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच मालाबाबत समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना सदर तांब्याच्या तारा चोरीच्या असल्याचा संशय बळावला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश भंडारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या धडक कारवाईमुळे जामखेड शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, जप्त करण्यात आलेल्या तांब्याच्या तारांचा उगम नेमका कोठून झाला, त्या कोठून आणण्यात आल्या आणि त्यांचा चोरीशी संबंध आहे का, याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करत आहेत.