शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी : जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे खैरी धरण ओव्हर फ्लो,धरणातून विसर्ग सुरू,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील खैरी धरण कधी भरणार याकडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.अखेर शुक्रवारी जामखेड तालुक्यात सर्वात मोठे असणारे खैरी धरण ओव्हर फ्लो झाले आहे.धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. बालाघाटात सध्या जोरदार पाऊस पडतोय.या पावसाचा जोर असाच काय राहिला तर धरणाच्या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती खैरी प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश काळे यांनी दिली.

जामखेड तालुक्यातील भूतवडा नवा जुना, मोहरी, नायगाव, काझेवाडी (रत्नापुर) हे तलाव भरले होते. परंतू तालुक्यातील सर्वात मोठे असणारे खैरी धरण कधी भरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.अखेर शुक्रवारी सातेफळ येथील खैरी धरण ओव्हर फ्लो झाले आहे.धरणाच्या भिंतीवरून ९.०० क्युसेक्स विसर्ग सुरु झाला आहे. खैरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे खर्डा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ऑगस्ट महिन्यात फक्त चौथ्यांदा भरले खैरी धरण
खैरी धरण खर नदीवर उभारण्यात आलेले जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे धरण आहे.१९७८ साली या धरणाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. १९९० साली ते पुर्ण झाले.तेव्हापासून धरणात पाणी साठवले जाते.खैरी मध्यम प्रकल्पाचा एकुण पाणीसाठा ५३३.६० द.ल.घ.फु (१५.११ द.ल.घ.मी.) इतका असुन उपयुक्त पाणीसाठा ४८५.२२ द.ल.घ.फु (१३.७४ द.ल.घ.मी.) आहे.
गेल्या ३५ वर्षांत खैरी धरण पुर्ण क्षमतेने भरण्याची आजची १६ वी वेळ आहे. तर धरण बांधल्यापासून ऑगस्ट महिन्यात धरण भरण्याची आजची चौथी वेळ आहे.यापुर्वी १९९८, २०१०, २०२४ या तीन वर्षी धरण ऑगस्ट महिन्यात भरले होते. सर्वसाधारणपणे हा प्रकल्प सप्टेंबर महिन्यात भरतो. खैरी मध्यम प्रकल्पाच्या नदीकाठाजवळ वंजारवाडी, तरडगाव, सोनेगाव, धनेगाव, चिंचपूर बुद्रुक, पांढरेवाडी ही गावे आहेत तर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राजवळ सातेफळ, वाकी, लोणी बाळगव्हान व खर्डा या गावांचा समावेश होतो.

यावर्षी सुरुवातीपासूनच खैरी प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रकल्प ऑगस्ट मध्येच पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. सध्या जामखेड तालुक्यात तसेच प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असून प्रकल्पाचे पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे.आज दिनांक 29/08/2025 रोजी दुपारी 03 वाजून 11 मिनिटांनी खैरी धरणाच्या सांडव्यावरून नदीपत्रात 9 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे.

खैरी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यामुळे नदीपात्रातील विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाचे वतीने प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राजवळील व प्रकल्पाच्या खालील बाजूस असणारी नदी काठाजवळील गावे, वस्त्या ,वाडे, तांडे येथील शेतकरी व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बुडीत क्षेत्रातील व पुर रेषेपर्यंतच्या नदीपात्रातील आपली प्राणी, पशुधन, मौल्यवान वस्तू, कृषी पंप, शेती औजारे इत्यादी सुरक्षित जागी हलवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. सांडव्यातून नदीपात्रात विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे पाणी येण्याची शक्यता असल्याने सांडव्यातून व नदीपात्रातून ये-जा करताना दक्षता घेण्यात यावी, असे अवाहन खैरी प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश काळे यांनी केले आहे.
खैंरी मध्यम प्रकल्प : २९/०८/२०२५
पाणी पातळी. ५६२.३१ मिटर.
एकूण साठा.१५.११० (द.ल.घ.मी.)
एकुण साठा. ५३३.६० (द.ल.घ.फु.)
उपयुक्त साठा. १३.७४० (द.ल.घ.मी.)
उपयुक्त साठा. ४८५.२२(द.ल.घ.फु.)
आजचा पाऊस.. ९.०० (मि.मी.)
एकुण पाऊस. १९४.०० (मि.मी.)
आ.उपयुक्त टक्केवारी. १००.०० %
आजचा विसर्ग. ०९. क्युसेक्स
सरासरी विसर्ग. ०९.०० क्यूसेक्स
एकुण विसर्ग. ९.०० क्युसेक्स