मोठी बातमी : गांजा तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, ३० लाखांच्या गांजासह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त, नगर एलसीबीची धडक कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा विक्री व वाहतुक करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ओडीसा राज्यातुन विक्रीस आणलेल्या ३० लाख रूपये किमतीच्या गांजासह एकुण ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २९ रोजी वडगांव गुप्ता शिवारात करण्यात आली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एलसीबीच्या धडक कारवाईमुळे गांजा तस्करांचे धाबे दणाणून गेले आहेत. या प्रकरणात अनेक बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Big news, Ganja smuggling racket busted, Ganja worth 30 lakhs and other valuables worth 80 lakhs seized, Nagar LCB takes strong action, ahilyanagar latest news today,

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंमली पदार्थाची विक्री व वाहतुक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे.त्यासाठी एलसीबीने दोन पथके कार्यरत केले आहेत.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली होती की, ओडीसा राज्यातून गांजा खरेदी करुन अहिल्यानगर जिल्ह्यात ट्रक क्रमांक एम.एच. १४ जी. यु. २१११ यामधून विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार एलसीबीने नगर एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत सापळा लावला होता.

फॉरेन्सिक टिम सह शेंडी बायपास ते एम.आय. डी. सी. जाणाऱ्या रोडवरील वडगांव गुप्ता शिवारातील हॉटेल किनाराजवळ दबा धरून बसलेल्या एलसीबीच्या पथकाला एम.एच. १४ जी. यु. २१११ हा ट्रक येताना दिसला. यावेळी पथकाने सदर ट्रक आठवला. त्याची झडती घेतली असता ट्रकमध्ये गांजाच्या गोण्या आढळून आल्या.

ट्रकची पंच, फॉरेन्सिक टिम यांच्या मदतीने झडती घेतली असता ट्रकच्या केबीनवरील टपावर ६ गोण्यामध्ये ३०, २२, ६२५/- रुपये किमतीचा १२० किलो ९०५ ग्रॅम गांजासह एकुण ८०,८३,४६४/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १) नवनाथ अंबादास मेटे वय ३८ वर्षे, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा २) ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे वय ३१ वर्षे, रा.मळेगांव, ता.शेवगांव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गांजा त्यांच्या दोन साथीदारांचा असून तो विक्रीकरीता आणला असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दोन साथीदारांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुध्द पोकॉ/प्रकाश नवनाथ मांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.र.नं. ६५०/२०२५ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असुन पुढील तपास एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने पार पाडली. कारवाईच्या पथकात स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जवराम जंगले यांचा समावेश होता.