- Advertisement -

विधानसभेचे विद्यापीठ | शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून आठवणींना उजाळा

राजकारणातील शेवटचा निष्कलंक चेहरा आज काळाने हिरावून घेतला.

 

सोलापुर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता  सोलापुर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारात सुरू असताना दु:खद निधन झाले. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख सलग ५५ वर्षे आमदार होते. त्यांना आबा या नावानेही ओळखले जायचे. गेल्या ५५ वर्षात त्यांच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. राजकारणातील शेवटचा निष्कलंक चेहरा आज काळाने हिरावून घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय  राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अनेकांनी आबांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत श्रध्दांजली अर्पण केली आहे.

 

महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला लोकप्रतिनिधी : शरद पवार
कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल. लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! अशी श्रद्धांजली शरद पवार यांनी वाहिली आहे.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

“राज्य विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

 

गणपतराव देशमुख आपल्या सोलापूर जिल्हयाचे वैभव होतं : सुशीलकुमार शिंदे

गणपतराव देशमुख आपल्या सोलापूर जिल्हयाचे वैभव होतं. आमदार म्हणून निवडुन आल्यानंतर समाजाचे प्रश्न मोठ्या हिरीरीने ते सभागृहामध्ये मांडत. विषेशतः दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायासाठी ते पोटतिडकीने भांडत असत. मी आमदार होण्याच्या आगोदर 12 वर्ष महाराष्ट्राच्या सभागृहात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना पहातोय. मी 1974 मध्ये आमदार झालो तेव्हापासून मी त्यांना अतिशय जवळुन पाहिलं आहे. जवळजवळ 11 वेळेस ते आमदार म्हणून त्यांनी सभागृहात आपल्या भागाचा नेतृत्व केलंय. मी एकदा प्रचाराकरिता सांगोल्याला गेलो होतो आणि त्यावेळेस माझे भांबुरे नावाचे साहायक निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभा होते. त्यावेळेस ते म्हणाले होते की हा तुमच्या पक्षाच्या उमेदवार आहे, तुम्ही माझ्या विरोधात पक्षाचा प्रचार करु शकता. असा दिलदारपणे सांगणारा आमदार क्वचितच!, अशा भावना ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल्या.

आमच्या पुलोद सरकारमध्ये ते शेतकी मंत्री होते. तेव्हा शरद पवार यांनी त्यांना इस्राईलमध्ये शेती बघण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या ड्रायव्हरकरिता एक घड्याळ घेतले आणि मुंबईत आल्यावर त्यांना दिलं. गरीब माणसाची आठवण ठेऊन त्याला देखील आपल्या कुटुंबातीलच एक असे समजुन सारखी वागणुक देणारा आमदार विरळाच! मी आत्ताच सोलापूरमध्ये होतो. आठ दिवसांपुर्वी त्यांना आश्विनी हॉस्पीटलमध्ये भरती केलं होते. ऑपरेशन झाले होते. सुखरुप घरी या अशा शुभेच्छा देऊन आलो होतो, अशी आठवणही शिंदे यांनी सांगितली.

 

गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : फडणवीस

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते.

इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा भावना विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

गणपराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत ! : नाना पटोले

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव ( आबा ) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत झाला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी 55 वर्षे प्रतिनिधीत्व केले. सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृत शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाही तर महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला – जयंत पाटील 

गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला. विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे. आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला.

मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

“ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील.

एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला! – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला, भाई एक निस्पृह आणि चारित्र्यवान नेते होते. शेतकरी, कष्टकरी व गरिबांप्रती ते आयुष्यभर कटिबद्ध राहिले. तत्व, मूल्य आणि विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांची लोकप्रियता अफाट होती व त्यामुळेच मतदारांनी त्यांना प्रदीर्घ काळ आपले प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली. जनतेच्या या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. प्रामुख्याने सांगोला परिसरासाठी त्यांनी मोठे काम केले. टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यासोबतच सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली.

मागील अनेक वर्ष विधिमंडळात त्यांचे काम जवळून बघण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा ते एक चालता-बोलता विश्वकोश होते. प्रचंड ज्ञान आणि अफाट कार्यक्षमता असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते असतानाही त्यांनी कधी बडेजाव केला नाही. आयुष्यभर त्यांची राहणी अगदी साधी राहिली. मागील विधानसभा निवडणुकीत ते ९३ वर्षांचे असताना सुद्धा पुन्हा त्यांनीच उभे रहावे, यासाठी तेथील जनता आग्रही होती. यातून अगदी नव्वदीतही त्यांची लोकप्रियता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास कायम होता, हे दिसून येते. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.