Ganapatrao Deshmukh passed away | शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख याचं निधन

 

 

 

ब्रेकिंग – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सोलापूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. पण आज संध्याकाळी त्यांनी वयाच्या 97 वर्षी अखेरचा श्वास घेतला.सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र तेव्हापासूनचं देशमुख यांच्या प्रकृतीत सतत चढ- उतार होत होते. मात्र आज त्यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

 

 

 

 

गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘आबासाहेब देशमुख यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आत्तापर्यंत चांगली होती. पण आज रात्री ९ वाजता आबासाहेबांचं निधन झालं.’

१० ऑगस्ट १९२६ ला त्यांचा जन्म झाला होता. १९६२ ला त्यांनी सांगोल्यातून सर्वात प्रथम निवडणूक लढवली. त्यानंतर पुढे ते ११ वेळा आमदार झाले. सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. आबा या नावाने ते सगळ्या महाराष्ट्रात परिचित होते.

गणपतराव देशमुख यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यापासूनच ते शेतकरी कामगार पक्षातच होते. शरद पवार यांनी जेव्हा पुलोद सरकारचा प्रयोग केला त्यावेळी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला होता. १९९९ लाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. २०१२ मध्ये विधानसभेतल्या त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारने त्यांचा गौरव केला होता.

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला होता.

२००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून एम.करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार ठरले होते.अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.

टेंभू, म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोल्याला आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याआधारे सांगोल्याला दुष्काळमुक्त केले. याशिवाय शेतकरी, कष्टकर्‍यांच्या मुलांसाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. वयाच्या ९४ व्या वर्षातही ते लोकहितासाठी सक्रिय होते. मात्र ल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावत गेली.

 

https://twitter.com/prajaktdada/status/1421169700113817608?s=20

 

 

 

 

 

गणपतराव देशमुख यांचे सांगोला येथील अत्यंदर्शन व अत्यंयात्रा

दि ३१/०७/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथून अत्यंयात्रा सुरवात

सकाळी १०.०० वाजता निवासस्थानी अत्यंदर्शन

दुपारी १२.०० वाजता सुतगिरणी येथे अत्यंदर्शन व अत्यंविधी