अहमदनगर : अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांचे आर्थिक सहाय्य मंजुर – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर दि.१२- ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, तसेच कामगार कल्याण विभागांतर्गत विमा योजनेत त्यांचा समावेश करण्याबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या संदर्भात आयोजित बैठकीत दिले.
अपघाती मृत्यू झालेल्या दोन ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीस मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे आदी उपस्थित होते.
अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. आतापर्यंत १० ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
आज झालेल्या बैठकीत शेतात औषध फवारणी करताना विषारी औषध पोटात गेल्याने मरण पावलेल्या मंदा कराड आणि मोटारसायकल वरून पडून मृत्युमुखी पडलेल्या मोतीलाल राठोड या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यास मान्यता देण्यात आली. एक प्रकरण मान्यतेसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला, तर इतर चार प्रकरणे नैसर्गिक मृत्यू असल्याने नामंजूर करण्यात आली.