- Advertisement -

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला ठणकावले, तुमच्या धमक्यांना आम्ही भिक घालत नाही

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  खरी शिवसेना आणि शिवसैनिक आम्हीच असून कुणाला घाबरवायचा प्रयत्न करताय, आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दिला आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी करणारे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिले आहे. कायदे आम्हीही जाणत असं सांगत एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा दाखला दिला आहे. त्यांनी याबाबत ट्विटरवर एक पोस्ट लिहली आहे.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कायदा आम्हीही जाणतो, तुमच्या असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही.

तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो

कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि शिवसैनिक आहोत. कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हिप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

शिवसेनेचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

पक्षाविरोधात बंड केलेल्या 12 आमदारांच्या विरोधात कारवाई करा, त्याचं सदस्यत्व रद्द करा अशा आशयाचे पत्र शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना देण्यात आलं आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली असून पहिल्या टप्प्यात 12 नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही त्यांनी सांगितलं आहे.

शिवसेनेकडून खालील आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली

1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) प्रकाश सुर्वे
5) तानाजी सावंत
6) महेश शिंदे
7) अनिल बाबर
8) यामिनी जाधव
9) संजय शिरसाट
10) भरत गोगावले
11) बालाजी किणीकर
12) लता सोनावणे