जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज मोठी धडक कारवाई केली आहे. एका अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दादा म्हस्के, नितीन गाडगे आणि राजेश जाधव अशी लाचखोरीत अडकलेल्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपघाताचा गुन्हा घडला होता. या गुन्ह्याची रीतसर नोंद घेण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली होती.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (१८ रोजी) दुपारी श्रीगोंदा पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. तडजोडीअंती ठरलेली ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या तिघांनाही तातडीने ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एकाच वेळी एकाच पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी लाच घेताना पकडले जाण्याची श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या इतिहासातील ही बहुधा पहिलीच घटना मानली जात आहे. या धडक कारवाईमुळे लाचखोर प्रवृत्तीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्यांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.