जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Abhishek Ghosalkar Murder Case। फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्याकांडाने मुंबईत (Mumbai Murder News) मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी माॅरिसभाईने घोसाळकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली. घोसाळकर हत्याकांड प्रकरणात आरोपी माॅरिसच्या बायकोने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
अभिषेक घोसाळकर यांची दहिसर भागात माॅरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई ने गुरूवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावेळी झालेल्या गोळीबारात घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील तीन गोळ्या लागून घोसाळकर गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. घोसाळकर हत्याकांडानंतर राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या घटनेचा वेगाने तपास हाती घेतला आहे. पोलिसांनी माॅरिचे कार्यालय सिल करत वेगाने तपास हाती घेतला आहे. वेगवेगळ्या पथकांच्या आधारे पोलिस तपास करत आहेत. माॅरिसच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
माॅरिसच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाने माॅरिसच्या पतीचा जबाब नोंदवला. यावेळी काही दिवसांपुर्वीच घटस्फोट झालेल्या माॅरिसच्या पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे. माॅरिसच्या मनात घोसाळकर यांच्याविषयी प्रचंड राग होता, माॅरिस हा बलात्काराच्या गुन्ह्यात चार महिने जेलमध्ये राहून जामिनावर बाहेर आला होता, जेलमधून बाहेर आल्यापासून तो सतत म्हणायचा की, मी अभिषेक घोसाळकरला सोडणार नाही, त्याला मारून टाकणार, असं तो बोलायचा अशी माहिती माॅरिसच्या पत्नीने पोलिसांना दिल्याची माहिती समोर येत आहे.
अभिषेक घोसाळकर हत्याकांड प्रकरणात दोन जण अटकेत
मयत आरोपी मॉरिसचा स्वीय सहाय्यक मेहुल पारीखला (mehul parikh) रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्यावेळी मेहुल पारीख घटनास्थळी उपस्थित होता. फेसबुक लाईव्ह सुरु असताना कॅमेराच्या मागे मागे मेहुलचं उपस्थित होता. मेहुल हा मॉरिसच्या अगदी जवळचा साथीदार असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे या हत्येचा कट रचण्यात त्याचीही काही भूमिका होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. मेहनत पारीखला ताब्यात घेतल्यानंतर रोहित शाहु उर्फ रावण (Rohit Shahu) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
त्या पिस्तुलाचा मालक दुसराच
मॉरिसने घोसाळकरांवर ज्या पिस्तुलमधून गोळीबार केला ते त्याच्या मालकीचं नव्हतं. मॉरिसला पोलिसांनी शस्त्र परवानाचा दिलेला नव्हता अशी माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता मॉरिसचा बॉडीगार्ड शर्मा यांच्या नावाने परवाना जारी केलेलं पिस्तुल मॉरिसने वापरल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी शर्माला अटक केली आहे.
माॅरिसभाईचे दुबई कनेक्शन उघड
मॉरिस हा सारखा दुबईला जायचा. आपला दुबईत कॅसिनो असल्याचा दावा तो करायचा. दुबईतील कॅसिनोचे अनेक फोटो हे त्याच्या सोशल अकाऊंटवर आहे. कॅसिनो व्यवसायासह बुकी म्हणून त्याची ओळख होती. बलात्काराचा आरोपाखाली मुंबई विमानतळावरच त्याला अटक झाली होती, जेव्हा तो दुबईहून भारतामध्ये परतला होता. त्याला आपली इमेज सुधारायची होती, त्यामुळे तो राजकीय नेत्यांच्या जवळ आला. त्याने दहिसरमध्ये कार्यालही थाटलं होतं. कोरोना काळात त्यानं अनेकांना राशन वाटल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
माॅरिसवर गंभीर गुन्हे दाखल
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दरम्यान मॉरिस भाईवर बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीसांरखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पत्रकारांनाही धमकावल्याचा आरोप मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवली होती. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने महिलेला धमकी दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
घोसाळकर हत्याप्रकरणानंतर विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू लागले आहेत. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सामंत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालत आहेत. राज्यात ज्यांच्याकडे शस्त्रं आहेत त्यांची आता चौकशी होणार आहे. ही शस्त्रं परवान्यासह बाळगली आहेत की, परवान्याशिवाय, याचा तपास केला जाईल, चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत.
पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे म्हणाले..
पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी या घटनेबाबतची माहिती देताना सांगितलं, गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचे स्त्रोत आणि त्याच्या कायदेशीर मान्यतेची खात्री करून घेत आहोत. गोळीबारानंतर घटनास्थळावरून दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं, उपचारांती दोघांचाही मृत्यू झाला आहे. आम्ही सध्या घटनास्थळावरून पुरावे संकलित करण्याचं काम करत आहोत. तसेच फेसबूक लाइव्ह आणि इतर काही पुरावे तपासात घेतले जातील.