कथा | भुकेच्या प्रदेशातली फुलपाखरं

 

भुकेच्या प्रदेशातली फुलपाखरं

गज्याला जुही चावला लै आवडायची.पेपरला आलेला तिचा प्रत्येक फोटो गज्या कापून तो नीट व्यवस्थित त्याच्या अंथरुणाखाली दडवून ठेवायचा.गज्या सोलापूरचा असल्यामुळे त्याच्या बोलण्याच्या ढंगात सोलापूरी ठासून भरलेली होती.” काय बे गाबड्या माझ्या नादाला लागू नगं रं भोसडीच्या “म्हणून दात चावत गज्या माझ्या अंगावर यायचा तेव्हा त्याचं ते रूप बघून लै हसू यायचं.गज्याच्या उलट आमचा शुभ्या होता.शुभम नावाप्रमाणे शुभ्या अगदी शांत असायचा.कुणाचं एक नाही की दोन नाही.गप्पा रंगल्या की तेवढाच रंगायचा.सगळ्यांच हसून झालं की मग हळूच हसायचा.त्याला काय कळलं तरी हसायचा आणि नाही कळलं तरी, मला सगळंच कळलंय याचा भाव चेहऱ्यावर आणून उगाच एकदम मोठ्याने हसायचा आणि अचानक शांत व्हायचा.शुभ्या कोल्हापूरचा होता.

आणखी एक जनावर आमच्यात होतं. उस्मानाबादचा कैल्या. लै डांबरट जात. म्हणजे याचं त्याला त्याचं त्याला सांगून गडी भांडणं लावून मोकळा व्हायचा.अस्सल नाग होता कैल्या.तोंडात कायम शिव्या असायच्या. त्याच्याशी बोलायचं म्हणलं तरी पोटात गोळा यायचा.पण कैल्याला आईची आठवण आली की हंबरडा फोडून अंथरूनात रडायचा.मग रात्रभर त्याचं कॅसेट चालायचं ते बी हुंदके देत एकदम सुरात.कधी कधी कैल्या इतका रडायचा की आमच्या तिघांच्या डोळ्यात आपोआप पाणी यायचं. म्हणून तिघेजण आम्ही हळूच त्याच्या जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवायचो. खांद्यावर हात टाकला की कैल्या हात जोरात झटकायचा आणि आम्ही आम्हाला थेट शिव्या सुरू करायचा.”अरे कुत्र्यांनो तुमच्यासारख्या कडू लोकांना आई काय कळणार रे लेंडकानो ” उगाचच शिव्या. आणि ते हुंदके देतच.त्याच्या तोंडातून शिव्याचा पट्टा सुरू झाला की, आम्ही तिघेजण एकमेकांच्या तोंडाकडे रागाने बघायचो. म्हणजे आता उठायचं आणि कैल्याला तुडवायचा हाच काहीसा भाव आमच्या चेहऱ्यावर असायचा.

पण आम्ही राग गिळून गप्प आपापल्या अंथरुणात जाऊन पडायचो.मग कैल्या हळूच मुतायला बाहेर गेला की, ” गज्या हळूच म्हणायचा या गाबड्याला कसा काढला असल रं याच्या बा ने ” याची आई मेली बिली तर ही औलाद सगळ्या गावाला दगड मारत हिंडत बसल.” गज्याच्या बोलण्याने लै हसायला यायचं.पण कैल्याच्या भितीने अंगावर घेऊन आम्ही दबकत दबकत हसायचो.आणि लहान बाळ जसं रडून झाल्यावर हुंदका देत झोपून जातं तसं कैल्या हुंदका देत झोपून जायचा.

मी सांगलीचा होतो.दिसायला रंगाने काळा असल्यामुळे या तीन औलादीनी मला कधीच नावाने हाक मारली नाही.मला कायम काळ्याच म्हणायचे.या तिघांना एकत्रित बांधून ठेवणं माझ्या अंगात आता भिनलेलं होतं.म्हणजे प्रत्येकाची खोड मला माहित झालेली होती.

दिवस संघर्षाचे होते.आम्ही बॅचलर होतो.त्या दहा बाय पंधराच्या खोलीत चार जिल्ह्याचे चार नमुने आम्ही एकत्रित राहत होतो. आळीपाळीने स्वयंपाक बनवत होतो.भांडी घासत होतो.कधी भात करपत होता तर कधी डाळ कच्ची राहत होती.ज्याने बनवलं त्याला घोडा लावला जात होता.पण शिल्लक काही उरत नव्हतं. सगळं संपत होतं.म्हणजे हाताच्या बोटाला सुध्दा कधी खरकट राहिलेलं मला तरी आठवत नाही.कारण आमच्यात एक समान धागा होता जो मैत्रीच्या ही पलीकडचा होता.तो धागा म्हणजे भूक.भूक फार भयानक असते असं म्हणतात पण आमचं चौघांचं जुगाड जमलेलं असल्यामुळे आम्हाला भूक कायम सुंदरच वाटली.

चौघेही शिकत होतो.कुणाला कुठं काम मिळेल तिथं काम करून आम्ही एकत्र राहत होतो.रूमवर रात्री एकत्र यायचो.गज्या जुही चावलामध्ये रमायचा.शुभ्या उगाचच दात टोकरत बसायचा.कैल्या आईच्या आठवणीने बैचेन असायचा.आणि मी कविता लिहिण्यात रमलेला असायचो.रविवारी आम्हाला निवांत वेळ असायचा म्हणून आम्ही पुण्यात दिवसभर हिंडत बसायचो.

मला आठवतंय ओली भेळ किंवा वडापाव ते ही चौघात वर्गणी काढून घ्यायचं.त्यातही कांद्यासाठी आणि मिरचीसाठी शिव्या हासडल्या जायच्याच.हीच काय ती आमची पार्टी.शुभ्याने गावाकडून इस्त्री आणलेली होती.आणि त्यात ते स्वभावाने गरीब असल्यामुळे ती इस्त्री चौघांच्या हक्काची कधी झालेली ते कळलंच नाही.रविवारी कडक इस्त्री करून आम्ही चार नुमुने बोंबलत हिंडायचो.हाच काय तो आमचा एन्जॉय.

त्यादिवशी रविवार होता.गज्याच्या वाढदिवस होता. गज्या आज स्वतः खर्च करणार होता. आम्ही सकाळीच दहाला बाहेर पडलो.आम्ही कधी बस ने हिंडलो नाही. दिवसच घालवायचा असायचा मग पायीच सगळं. मला आठवतंय मी कैल्या आणि शुभ्या ने वीस वीस रुपये काढून गज्याला गिफ्ट घ्यायचं असं ठरवलं होतं आणि ते बी गज्या समोरच. त्यामुळे सरप्राईज वैगेरे असली भानगड नव्हती.आणि गज्या सतत बोंबलत होता ” ये फोद्रीच्यानो मला गिफ्ट कवा घेणार बे घ्या की लवकर काहीतरी.जिंदगीत कधी कुणी गिफ्ट घेतलं नाही बे मला.” त्याच्या जिंदगी या शब्दात तो जि वर लै जोर लावून बोलायचा त्यामुळं त्याच्या बोलण्याची मज्जाच वाटायची. आमची थोबाडे हिंडताना कायम  खी खी खी दात काढलेलीच असायची. त्यात शुभ्या जर हसला नाही तर कैल्या पार त्याच्या आयला …. लावून मोकळा व्हायचा.म्हणून त्याच्या भ्या ने शुभ्या जोरात दात काढून हसायचा.

मला एक गिफ्ट सेंटर दिसलं.म्हणलं चला रं इथं. गज्याला गिफ्ट इथूनच घ्यायचं.कारण गज्याचा जीव गिफ्ट साठी चाललेला होता. आमच्या आधी पळत जाऊन गज्या दुकानाच्या पायऱ्या चढत होता.आणि वरच्या पायरीवर गेल्यावर त्याच्या लक्षात आलं असावं की ही गाबडी पैसे देणार आहेत.मग गज्या गप्प उभा राहिला. आम्ही चौघेजण मग सोबत आत गेलो. शुभ्या म्हणला “एक पेन घ्या चांगला.”  शुभ्याचं कैल्याला काहीच पटत नव्हतं.लगेच कैल्या म्हणला पेन काय तुझ्या …. घालायचा का?.शुभ्या गप्प मी गप्प, गज्या गप्प.दुकानदार आमच्याकडे रागाने बघायला लागला.अस्सल पुणेरी दुकानदार तो असल्या शिव्या ऐकून रात्रभर त्याला झोप यायची नाही.काय घ्यावं काय घ्यावं काही सुचेना.तेवढ्यात कैल्या म्हणला “मालक जुही चावला चा फोटो हाय का..?” मालक बी म्हणला आहे की.त्याने मस्त एक जुही चावलाचा असा सुंदर फोटो तो ही फ्रेम केलेला बाहेर काढला.

गज्या एकटक फोटो कडे बघायला लागला. कैल्या म्हणला “हाच द्या आता. किती रुपयाला आहे..? दुकानदार म्हणला शंभर रुपये. आमच्या तिघांचे डोळे फिरले.आम्ही वीस वीस रुपये काढले तर साठ रुपये होत होते. कैल्या लगीच म्हणला “मालक तुमचं बी राहू द्या आणि आमचं बी राहू द्या.साठ रुपयाला देऊन टाका जुही चावला आमच्या गड्याची जान हाय ओ..” असं म्हणत गज्याच्या खांद्यावर हात टाकत कैल्या जरा थाटात उभा राहिला.तेवढ्यात मालक म्हणला, ” काय भाजीपाला घ्यायला आलाय का..?” फिक्स रेट आहे.कमी होत नाही. कैल्या हळूहळू अंग मुरगाळून उभा राहिला. व्यवहार काही जमत नव्हता.गज्या काही जुही चावला हातातून सोडत नव्हता.आणि आम्ही तिघेजण वीस रुपयांच्या वर एक रुपया काढायला तयार नव्हतो.

मी गज्याच्या हातातली जुही चावला हळूच घेतली. आणि दुकानदाराच्या हातात देत म्हणलं.चला पुढं बघू दुसरं काहीतरी.माझं वाक्य संपायच्या आत कैल्या आणि शुभ्या दुकानाच्या बाहेर.पण गज्या जागा सोडत नव्हता.त्याचा हात धरून त्याला बाहेर काढला. आम्ही पायऱ्या उतरायला लागलो तेवढ्यात दुकानदाराने आवाज दिला. ” ये पोरांनो ऐंशी रुपये द्या आणि घेऊन जावा” आम्ही थांबलो.पण ऐंशीचा ही मेळ लागणार नव्हता.

आम्ही तिघांनी एक साथ नको नको म्हणत माना हलवल्या.पण तेवढ्यात गज्या म्हणला ” ये फोद्रीच्यानो मी देतो वीस रुपये पण तेच गिफ्ट घ्या बे..” असं म्हणत त्याने वीस रुपये काढले सुद्धा.आम्ही बी तिघांनी वीस वीस रुपये बाहेर काढले.तिघांनी बी तेवढेच वीस रुपये वरच्या खिशात काढून ठेवलेले होते.मेळ लागला होता.जुही चावला आम्ही घेतली होती.दुकानदाराने मस्त तिचा फोटो असा कागद लावून गिफ्ट बनवून दिला होता. त्यावर लावलेल्या स्टिकरवर मी पेन ने प्रिय गजानन एवढंच लिहिलं होतं.गज्याने जुही चावला काखेत घट्ट दाबून धरली होती आणि आम्ही पायऱ्या उतरत होतो.आणि कैल्या म्हणला ” आता आज रात्रभर गज्या जुही चावलाला चावत बसणार बघा” शुभ्या लै जोरात हसला.आम्ही खी खी खी थोबाड वासत दात काढत रस्त्यावर आलो आणि चालायला लागलो.

पार दुपार झालेली होती.भूक लागलेली होती. गज्याकडे आज सगळं असल्यामुळे आता गज्या जेव्हा म्हणेल तेव्हाच खायला लागणार होतं. आणि ते ही गज्या काय घेईल तेच खावं लागणार होतं. आमच्या तिघांच्या मनात अपेक्षा खूप काही नाचत होत्या पण तेवढ्यात गज्या म्हणला चला मस्त वडापाव आणि भजी खायची.तोंडंच बारीक झाली आमची. पण चालून भूक लागलेली असल्यामुळे नाईलाज झाला.गरम वडापाव शोधत शोधत आम्ही निघालो.चौकात आलो.

कुठल्या तरी लग्नाची वरात निघालेली होती. वरात म्हणजे नवऱ्याला वाजवत मंडपात घेऊन चाललेले होते.नवरा मस्त घोड्यावर बसला होता.बँड वाजत होता.काहीजण नाचत होते. आमचं बी मन जरा रमलं.काही काळ आम्हीही भूक विसरून गेलो.आणि चौघेही थांबलो.घोडं पार वाकलेलं होतं.वर नवरा बसवला होता.बँड वाजत होता.आणि मी घोड्याकडे एकदा आणि कैल्या कडे एकदा बघत होतो.मला त्या घोड्यात आणि कैल्यात काहीच फरक जाणवत नव्हता.मी शुभ्याला हळूच म्हणलं ” शुभ्या हे घोडं आणि कैल्या सेमच हायत.तर शुभ्या हसत म्हणला ” नाही लेका तो घोडा तरी बरा पण हे गाढव हाय गाढव.आणि शुभ्या एकटाच हसायला लागला.

कैल्याला बँड मुळं काही ऐकायला गेलं नाही. तो शांतपणे एकटक त्या नवऱ्याच्या बाजूला पोरी हातात ताट घेऊन उभ्या होत्या त्यांना बघण्यात मग्न झालेला होता.मी म्हणलं “चला आता निघुया खाऊया बे काहीतरी आता.” तेवढ्यात गज्याने त्याची जुही चावला असलेलं गिफ्ट कैल्याच्या हातात देत म्हणला “धर रे जरा मी मुतून आलो.” आम्ही तिघेजण चालत थोडंस पुढं आलो.गज्या मुतायला गेला.

आम्ही तिघेजण गज्याची वाट बघत थांबलो होतो.बँडचा आवाज कमी झालेला होता. कैल्याच्या हातात ते गिफ्ट होतं.आम्हाला भूक लागलेली होती.काय झालं कुणास ठाऊक पण कैल्याच्या चेहऱ्यावर हळुवारपणे हसू उमटत चाललेलं होतं.कैल्याच्या डोक्यात काहीतरी शिजायला लागलेलं होतं.मी ओळखलं आणि त्याला म्हणलं “काय रे कैल्या काय झालं?.” तसा कैल्या म्हणला “काळ्या,शुभ्या आज पोटभर जेवायचं का ..?” मी म्हणलं कुठं रं..? कैल्या म्हणला  “त्या लग्नात” मी म्हणलं “कुणी हाकलून दिलं तर..?.” शुभ्या तर “म्हणला तुमचं तुम्ही काशी करा मी न्हाय येत.”

कैल्या म्हणला ” अरे मी हाय ना तुम्ही फक्त सोबत चला हे हातात गिफ्ट हाय आपल्या. तेच घेऊन जायचं मंडपात.” मला त्याचं पटत चाललं होतं.कारण भूक लै लागली होती. तेवढ्यात गज्या आला.कैल्याने त्याला सांगितलं. गज्या एका सेकंदात तयार झाला. कारण कडूचे पैसे वाचणार होते.कैल्या म्हणला कुणी काही कुणाला ओळखणार नाही. हे गिफ्ट सगळ्यांना दिसेल असं हातात धरून आत वावरत राहायचं. कैल्या लै मुरलेला होता.त्याने प्लॅनिंग सांगायला सुरुवात केली तेवढयात गज्या म्हणला “हे बघ कैल्या काहीही काशी कर पण जुही चावला मी देणार नाय..” कैल्या म्हणला नाय द्यायची कुणाला जुही चावला फक्त हातात घेऊन जायचं तिथं जेवायचं आणि हातात घेऊनच हळूच बाहेर पडायचं.”

आम्ही बँड च्या आवाजाने चालू लागलो. कुठंतरी आतल्या एका गल्लीत ते मंगल कार्यालय दिसलं.बाहेर गेटवर गर्दी होती. आम्ही तिथंच थांबलो. कैल्या एकटाच आधी जुही चावलाला घेऊन आत गेला.नंतर आम्ही तिघेजण गेलो.कैल्याने आम्हाला बघितलं आणि तेवढ्यात गर्दीत कैल्या ओरडला.”अरे शुभम ये नितीन ये गजानन ” कैल्या चक्क आम्हाला नावाने हाक मारत होता आणि ते ही शुद्ध पुणेरी मराठीत.गज्या मी आणि शुभ्या जवळ गेलो. कैल्या म्हणाला, ” गाडी व्यवस्थित पार्किंग लावली का रे..” माझ्या गोट्या कपाळात गेल्या.. गाडी…? तेवढ्यात गज्या म्हणला हो तिकडे लावलीय दादा. कैल्याला गज्या दादा म्हणत होता.शुभ्या ला घाम फुटला होता.आणि कैल्या शुभ्याच्या हाताला धरत म्हणत होता ” अरे शुभम काय चाललंय सध्या तुझं.. मामा मामी कसे आहेत आलेत का..? अरे आत्या शोधत होती तुला.तिकडे नवरीच्या रूम मध्ये आहे नंतर आठवणीने भेट तिला.” कोण आत्या कोण मामा कुठली मामी शुभ्याला घंटा काही कळत नव्हतं. पण मी शुभ्याचा हात घट्ट आवळून धरला.आणि आम्ही मंडपात यशस्वीपणे आगमन केले.

आम्ही चार खुर्च्या पकडल्या. कैल्याने आधीच सांगितलं होतं जेवणाच्या दिशेला ज्या खुर्च्या जवळ असतील त्या धरायच्या आम्ही त्याच धरलेल्या होत्या. मंडपात अक्षता वाटप सुरू झालेलं होतं.दोघेजण अक्षता वाटत होते.एकजण आमच्या जवळ आला आमच्या हातात अक्षता देणार तोच कैल्या उठला आणि म्हणाला “पाहुणे द्या इथं परात मी या बाजूला वाटतो. तुम्ही त्या बाजूला जा.” आणि कैल्या मंडपात अक्षता वाटायला लागला सुद्धा.आम्हा तिघाला घाम फुटत चालला होता.आणि आता तर कैल्या परात घेऊन बायका जिकडे बसलेल्या होत्या तिकडे गेला. आणि पोरींना अक्षता वाटत होता. बराच वेळ आम्ही तिघेजण अवघडल्यागत बसलो.नवरा नवरी नटत होते. माईकवर कुणीतरी बोंबलत होता “वधू वरास लवकरात लवकर लग्न मंडपामध्ये आणायची कृपा करावी.”

कैल्या डबल डबल अक्षता वाटत होता. नटलेल्या पोरी बघून कैल्या भूक विसरून गेला होता. त्या अक्षता वाटल्यामुळे सगळ्या गर्दीच्या डोळ्यात कैल्या भरलेला होता. सगळ्यांना कैल्या जवळचा वाटायला लागला होता.तसं लोकांच्या नजरेत मला दिसत होतं. आणि माझ्याजवळ शुभ्या मात्र ते जुही चावला असलेलं गिफ्ट हात उंचावून दाखवायला लागला.मी पटकन ते गज्याच्या हातात दिलं.आणि शुभ्याला म्हणलं ” अरे ये वांडरा गप घाल ना तुझी..” तर शुभ्या म्हणला ” आर ते सगळ्यांना दिसलं पायजे ना..? मी कपाळावर हात मारला आणि गप्प बस म्हणलं. आजूबाजुला लोकं बसलेली असल्यामुळे मी जास्त काही त्याला बोललो नाही आणि कुणाला काही कळू दिलं नाही. कैल्याने सगळ्या मंडपात अक्षता वाटून ती मोकळी झालेली परात एका पोरीच्या हातात देऊन तिथंच तिच्याशी बोलायला बघत होता.पण मी जबाबदारीने त्याला तिथून ओढून आणला.आणि जवळ बसवला.

वधू वर समोर उभे होते. मंगलष्टीका सुरू झाल्या. एक एक कडवे संपल तस आम्ही चौघेजण ते अक्षता म्हणून हातात असलेलं तांदूळ भिरकावत होतो तर कधी फेकून मारत होतो.आणि हळूच जेवणाच्या हॉल कडे बघत होतो.ती जेवणाच्या दिशेने मान वळवून बघण्याची क्रिया मात्र एकाचवेळी एकाच सुरात घडत होती.अखेर शेवटच्या अक्षता पडल्या आणि माईकवर कुणीतरी बोललं की, “पाहुणे मंडळी,मित्र मंडळी जेवल्याशिवाय कुणीही जाऊ नये जेवणाची सोय उजव्या बाजूला केलेली आहे.कुणीही जेवण न करता जाऊ नये अशी लग्न मंडपाच्या मालकाची व दोन्ही परिवाराची कळकळीची विनंती आहे.

” आम्ही उभे राहिलो. जेवणाच्या दिशेने चालू लागलो.जवळच होतं सगळं. मला शुभ्याची काळजी होती.म्हणून मी तेवढ्या गर्दीत शुभ्याचा हात धरायला गेलो.बाजूला पाहतो तर शुभ्याच गायब. त्या खुर्च्यामधून तशीच वाट काढत मी थोडंसं पुढं आलो आणि कैल्याला आणि गज्याला म्हणलं ” अरे शुभ्या गायब हाय ना कुठं गेलं काय माहीत.” कैल्या लै चिडला आणि शिव्या देण्यासाठी त्याचे ओठ पुटपुटणार तेवढ्यात  कानावर एक गोड आवाज आला. ” ओ कैलास दादा, ओ नितीन दादा ओ गजू भाऊ या इकडं..” आम्ही झटकन त्या दिशेने बघितलं.तर शुभ्या पंगतीला बसलेला होता खुर्चीवर. आणि ते ही तीन खुर्च्या मोकळ्या ठेवून.आमची जागा धरून ठेवलेली होती शुभ्याने.आम्ही मंदपणे हसत हसत वर्हाडी असल्यागत त्या जागेवर जाऊन बसलो.शुभ्या ताठ मानेने इकडं तिकडं बघत बसलेला होता.आमच्या लिडरची जागा शुभ्या ने कधी आणि कशी घेतली कळलंच नाही.कैल्या शांत झालेला होता आणि आता शुभ्याच मोठ्याने  बोलत होता. ” मावशी आलीय का रे..? अरे दिदी दिसली होती मघाशी. भेटला का तू मावशीला.शुभ्या अगदी बिनधास्त झाला होता.आणि आता कैल्यालाच घाम फुटला होता.

समोर मोकळी ताटं आलेली होती. मंडपात खमंग वास सुटलेला होता.एक एक पदार्थ आमच्या ताटात विराजमान होत होता. भजी,गुलाब जामुन, श्रीखंड, पुऱ्या दोन तीन प्रकारच्या सुक्या भाज्या,ताक पापड लिंबू लोणचे अहाहा आम्ही चौघेही तुटून पडणार होतो. कैल्या तर पार भान हरपून त्या ताटात बघत होता.अजून कुणी सुरवात केलेली नव्हती.म्हणून आम्हीही गप्प होतो.पण गज्या आणि शुभ्या हळूच पापडाचा एक एक तुकडा चघळत होते.तेवढ्यात ज्याच्याकडून कैल्याने अक्षता वाटण्यासाठी परात घेतली होती तो पाहुणा एका म्हाताऱ्याला घेऊन समोर आला.आता कैल्याची आणि त्याची ओळख झालेली होतीच.आणि फार जवळचं नातं असल्यागत तो कैल्याला म्हणाला ” काय राव पाहुणे… तुम्ही सगळ्यात आधी बसला की जेवायला.ते बी आम्हाला सोडून.अहो तुमच्यासारख्या कार्यकर्त्याने असं करून कसं चालेल.उठा तुम्ही आपण नंतर जेवू या आजोबांना बसू द्या.तुम्ही या इकडं आपण जरा वाढप्या लोकांवर लक्ष ठेवूया.”

कैल्या उठला.ते आजोबा बसले.आम्ही तिघेजण शांतपणे जेवायला लागलो.आमच्या तिघांपैकी एकाची सुद्धा जेवण होईपर्यत मान वर झाली नाही.जेवताना कैल्याचा आवाज तेवढा मात्र येत होता तो वाढप्याना आदेश देत होता.कुठं भात कुठं भाजी वाढायची हे पाहुण्यांना विचारून बोलावून सांगत होता. कैल्याच्या तोंडात त्यावेळी किती शिव्या येत  असतील हे फक्त मला माहित होतं.पण आमच्या तोंडात गुलाब जामुन विरघळत होते हे मात्र नक्की. पोटभर जेवलो. आणि उठलो.

कैल्या वाढप्याना सांगत तसाच उभा होता. आमच्याकडे केविलपणे बघत होता.पहिली पंगत कधी संपेल याची वाट बघत होता. आम्ही त्याच्या जवळ गेलो.म्हणलं ” कैल्या आम्ही बाजूला थांबतो.तू आताच्या पंगतीला जेव. तू जेवल्याशिवाय आम्ही बाहेर जाणार नाही.”  कैल्याने माझा हात घट्ट धरला.आणि मोठ्याने सुस्कारा टाकत म्हणला ” जाऊ पण नका. लै भूक लागलीय रं.” पहिली पंगत उठण्याची आणि दुसरी पंगत बसण्याची वाट बघत आम्ही कैल्याजवळच थांबलो..

आम्ही तिघेजण खच्चून जेवलेलो होतो.एक बडीशेप चा दाणा सुद्धा आमच्या पोटात जाऊ शकत नव्हता. पण कैल्याची आतडी कावली होती.कावलेली म्हणजे खूप खूप सुकून गेलेली होती.आणि तेवढ्यात मेन मंडपात दंगा सुरू झाला.हाणामारी सुरू झाली.कुणी कुणाच्या अंगावर जात होतं. कुणी खुर्च्या मारत होतं.काही कळत नव्हतं. हळूहळू तो कालवा इतका वाढला की बायका आनि लहान मुलं बाहेरच्या दिशेला पळायला लागली.कुणीतरी कुणाला तुडवत होतं. पहिली पंगत उठली.पण दंगा इतका वाढला की दुसरी पंगत बसलीच नाही.

मंडपातून नवरी पळून गेलेली होती. नवऱ्याकडचे लोकं चिडलेले होते.नवरा गोंधळून गेला होता.घोड्यावर बसला होता तेव्हा त्याचा रुबाब होता आता पार त्याच्या तोंडाचा चंबू झालेला होता.आता काही करून तिथून आम्हाला निघायला हवं होतं. कैल्याच्या हाताला घट्ट धरून ओढलं पण कैल्या ओसाड पडलेल्या पंगतीकडे एकटक बघत होता.त्याने ज्या म्हाताऱ्याला जेवायला जागा दिलेली होती ते म्हातारं मात्र एकटंच हळूहळू जेवत होतं.त्याला कुणाशी काही देणंघेण नव्हतं. कैल्या पार रडकुंडीला आलेला होता.त्याला त्याच्या आईची आठवण येऊ नये आणि हा हंबरडा फोडून इथच बोंबलू नये याची मला भिती वाटत होती. शुभ्या दात टोकरत भांडण बघत शांतपणे उभा होता.गज्याने जुहीला गच्च आवळून धरलेली होती.आणि कैल्या आयुष्यातून उठल्यागत इकडं तिकडं बघत होता.

त्या मंडपात नवरी मुलगी पळून गेल्यामुळे लोकं दुःखी होते.आणि आम्ही आमचा दोस्त उपाशी राहिला म्हणून नाराज होता. कैल्याच्या डोळ्यात पाणी यायला सुरुवात झाली. आम्ही तिघांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवले. त्यानं शिव्या दिल्या नाहीत.तो फक्त इतकंच म्हणाला.”भुकेच्या प्रदेशातली वणवण करत फिरणारी आपण चार सुंदर फुलपाखरं आहोत. यार काहीही म्हण पण आपण ग्रेटच आहोत.” कैल्याने गज्याच्या हातातली जुही चावला हिसकावून घेतली. आणि कैल्या टुचकी वाजवत म्हणला,आता ही जुही चावला अशीच गिफ्टमध्ये राहणार. आता फक्त आपण मंडप बदलत राहायचं.”

कित्येक काळ ती जुही चावला तशीच बंद राहिली. आम्ही चौघांनी तिला घेऊन खूप लग्न जेवलो.आणि प्रत्येक मंडपातून ज्यावेळी आम्ही ढेकर देत बाहेर यायचो.तेव्हा कैल्या त्या जुहीला हातात धरून एकच वाक्य बोलायचा,
” भुकेच्या प्रदेशातली वणवण करत फिरणारी आम्ही फार सुंदर फुलपाखरं आहोत.”

दंगलकार नितीन चंदनशिवे.
मु. पो. कवठेमहांकाळ जि.सांगली.
मो.नं.7020909521.( आपली प्रतिक्रिया थेट कळवू शकता.)